हजारो ‘उज्ज्वला’ आल्या पुन्हा चुलीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 05:00 AM2021-02-25T05:00:00+5:302021-02-25T05:00:22+5:30
उज्ज्वला गॅस योजनेतून शहराच्या ग्रामीण भागापर्यंत एकूण २० हजार ८३३ कुुटुंबांमध्ये पहिल्यांदाच गॅस कनेक्शन मिळाले होते. लाकडे जाळण्यातून होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासोबतच महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना होणारा त्रास वाचण्यासाठी गावोगावी गॅस सिलिंडर, शेगडी असे साहित्य कोणतेही शुल्क न आकारता वाटण्यात आले. अर्थात नंतरच्या रिफिलिंगमध्ये शेगडी आणि हंड्याचे पैसे जोडण्यात आले. अनेक घरी गॅस कनेक्शन कायम आहे, पण सिलिंडर रिकामे पडून आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोरगरीब कुटुंबातील महिलांची चुलीतील धुरापासून सुटका करण्यासाठी केंद्र सरकारने २०१६ मध्ये उज्ज्वला गॅस योजना आणली. कमी उत्पन्न गटातील कुटुंबात या योजनेतून गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्यातील २० हजारांवर गृहिणींना मोठा दिलासा दिलाख पण आता गॅसचे दर आवाक्याबाहेर गेल्याने गॅसचा हंडा घेणे अनेक कुटुंबांसाठी अशक्य होत आहे. परिणामी घरात गॅस कनेक्शन असूनही ६७६४ कुटुंबीयांनी चुलीवर स्वयंपाक करणे सुरू केले आहे.
उज्ज्वला गॅस योजनेतून शहराच्या ग्रामीण भागापर्यंत एकूण २० हजार ८३३ कुुटुंबांमध्ये पहिल्यांदाच गॅस कनेक्शन मिळाले होते. लाकडे जाळण्यातून होणारी पर्यावरणाची हानी टाळण्यासोबतच महिलांना चुलीवर स्वयंपाक करताना होणारा त्रास वाचण्यासाठी गावोगावी गॅस सिलिंडर, शेगडी असे साहित्य कोणतेही शुल्क न आकारता वाटण्यात आले. अर्थात नंतरच्या रिफिलिंगमध्ये शेगडी आणि हंड्याचे पैसे जोडण्यात आले. अनेक घरी गॅस कनेक्शन कायम आहे, पण सिलिंडर रिकामे पडून आहे.
दीड वर्षांपासून नवीन कनेक्शन देणे बंद
जिल्ह्यात सप्टेंबर २०१९ पासून उज्ज्वला गॅस योजनेतून नवीन कनेक्शन देणेच बंद झाले. त्यामुळे ही योजना शासनाने गुंडाळली की काय, असे चित्र आहे. चंद्रपूर येथे बसणाऱ्या एका नोडल अधिकाऱ्याकडे वारंवार संपर्क केल्यानंतरही संबंधित अधिकारी पुरेशी माहिती देऊ शकले नाहीत.
यापूर्वी ६७६४ जणांनी उज्ज्वला योजनेतून गॅस घेणे बंद केले होते. गेल्या काही महिन्यांत गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे हंडा भरून न घेणाऱ्यांची संख्या आता १० हजारांच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी गॅस रिफिलिंग केलेले हंडे मिळण्याची सुविधा आहे.
चुलीवरचा त्रास परवडला पण महागडा गॅस नकाे
सिलिंडरचे भाव तर वाढलेच, पण सबसिडीही मिळत नाही. जेमतेम ४० रुपये बँकेत जमा होते. अगोदर सिलिंडरचे भाव कमी होते आणि सबसिडीही देत होते. आता भाव वाढविले आणि सबसिडी कमी केली. म्हणून आता नियमित गॅस वापरणे कठीण झाले आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने लाकडे जाळून चूल पेटवावी लागत आहे.
- प्रणाली पाथोडे, गडचिरोली
घरगुती गॅस सिलिंडरचे भाव सुरुवातीला ३०० ते ३५० रुपयापर्यंत होते. आता दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडत नाही. त्यामुळे आम्ही चुलीवरच स्वयंपाक करणे सुरू केले आहे. थोडा त्रास होत असला तरी चुलीवरचा स्वयंपाक परवडतो. गोरगरिबांचा विचार करून भाव कमी केले तर पुन्हा गॅस वापरू.
- राजकुमारी सुरेश मेश्राम, कोरची
गॅसचे भाव आता गोरगरिबांच्या आवाक्यात राहिले नाहीत. चुलीवरचा त्रास परवडला, पण गॅसचे भाव नाही परवडत. उज्ज्वला योजनेतून गॅस भेटला, पण सिलिंडर भरून आणण्यासाठी तर पैसे द्यावेच लागणार ते कुठून आणायचे, फक्त गॅसच नाही बाकीचा पण खर्च वाढला आहे. मग कुठेतरी बचत करावी लागेल ना?
- शकुंतला कोटेश, ताल्लापेल्ली, ता.सिरोंचा
सुरुवातीला चुलीवर स्वयंपाक करताना धुराचा खूप त्रास होत होता. मोदी सरकारने प्रदूषणमुक्त वातावरणासोबत महिलांना चूल पेटविण्याचा त्रास होऊ नये म्हणून उज्ज्वला योजनेतून गॅस दिले. ३५० रुपयांत गॅस मिळत होता. आज ८३५ रुपयांत घ्यावा लागतो. एवढ्या महागाचा गॅस वापरणे परवडणार आहे का?
- कमला तिलक मडावी, कोरची
गॅस सिलिंडरचे भाव ७८५ ते ८३५ झाले आहेत. त्यामुळे सिलिंडर घेणे आम्हाला आता कठीण झाले आहे. त्याचबरोबर जंगलातून लाकडे आणणेसुद्धा कठीण झाले आहे. वनविभाग जंगलातील लाकडे घेऊ देत नाही. मग गोरगरिबांनी चूल कशी पेटवायची, याचे उत्तर सरकारने द्यावे.
- सोनी प्रवीण पुद्दटवार, अंकिसा (ता.सिरोंचा)