हजारो शेतकरी व कार्यकर्ते जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:39 PM2017-12-08T22:39:39+5:302017-12-08T22:39:56+5:30
विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर व सर्वच क्षेत्रातील नागरिक संतप्त आहेत. शिवाय राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर व सर्वच क्षेत्रातील नागरिक संतप्त आहेत. शिवाय राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. विविध समस्या व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. नागपूर येथील जनआक्रोश मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातून हजारो शेतकरी व कार्यकर्ते जाणार आहेत.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशनात नागपूर येथील विधानसभेवर १२ डिसेंबर रोजी मंगळवारला जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासंदर्भात येथील काँग्रेस कार्यालयात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक सुरेश भोयर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजन बैठक शुक्रवारी पार पडली.
या बैठकीत वाहतुकीची साधने, आसन व्यवस्था व इतर बाबींचे नियोजन करण्यात आले. बैठकीला माजी आ. आनंदराव गेडाम, माजी आ. पेंटारामा तलांडी, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, शंकरराव सालोटकर, निशांत नैताम, बंडू आत्राम, सी.बी. आवळे, पांडुरंग गोटेकर, रजनीकांत मोटघरे, पी.टी. मसराम, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, पं.स. सभापती दुर्लभा बांबोळे, नेताजी गावतुरे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, धानाला प्रतीक्विंटल ४ हजार ५०० रूपये भाव द्यावा, सोयाबीनला प्रतीक्विंटल ७ हजार व सोयाबीनला १० हजार रूपये भाव देण्यात यावा, ओबीसींसह सर्व मागसवर्गीयांची प्रलंबित शिष्यवृत्ती अदा करावी, आदी मागण्यांसाठी मोर्चा धडकणार आहे. सभेचे संचालन जिल्हा सचिव एजाज शेख तर आभार बाळू मडावी यांनी मानले.