हजारो शेतकऱ्यांनी घेतली कृषी यंत्रांची माहिती
By admin | Published: September 18, 2015 01:16 AM2015-09-18T01:16:30+5:302015-09-18T01:16:30+5:30
कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय तसेच कृषी संशोधन केंद्र सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श दत्तक गाव येवली येथे बुधवारी कृषी मेळावा, ...
येवलीत कृषी मेळावा : शेतीपूरक व्यवसाय व भाजीपाला लागवडीबाबत मार्गदर्शन
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय तसेच कृषी संशोधन केंद्र सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श दत्तक गाव येवली येथे बुधवारी कृषी मेळावा, कृषी प्रदर्शनी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवून यंत्र व आधुनिक शेतीबाबतची माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रणजीतकुमार, सरपंच गीता सोमनकर, उपसरपंच सुरेखा भांडेकर, पोलीस पाटील लक्ष्मीछाया मेश्राम, विलास भांडेकर, आदर्श ग्राम समितीचे अध्यक्ष सी. पी. भांडेकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. पी. लांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
कृषी मेळाव्यादरम्यान डॉ. एस. पी. लांबे यांनी प्रक्षेत्रावरील प्रात्यक्षिकांची माहिती देऊन हायब्रिड यशवंत नेपीअर चारा गवत, दुधाळ जनावरांच्या जाती, भाजीपाला, ट्रे नर्सरी, पीकेव्ही दालमील, अझोला, शिंगोळा याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रादरम्यान शेतकऱ्यांनी पिकांविषयीच्या समस्या मांडल्या. शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
शेतकऱ्यांना कृषी महाविद्यालयाचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. एस. पी. ब्राह्मणकर, कीटक शास्त्रज्ञ डॉ. पी. एस. नेहरकर, मृद शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. बालपांडे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ डॉ. एस. एल. बोरकर, प्रा. डी. एन. अनोकार, प्रा. वाय. के. सानप, प्रा. एस. एस. कऱ्हाळे, प्रा. व्ही. पी. सातार यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्यात विविध प्रकारची आधुनिक शेती साहित्य व यंत्र ठेवण्यात आले होते. याबाबतची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी जाणून घेतली.
कार्यक्रमाला कृषी संशोधन केंद्राचे प्रा. जी. बी. गणवीर, प्रा. योगेश चौके, डॉ. गणेश भगत, डॉ. विजय काळबांडे आदी उपस्थित होते. संचालन व आभार प्रा. एस. एस. कऱ्हाळे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)