हजारो विद्यार्थिनींना ‘बस पास’चा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:29 AM2017-09-11T00:29:59+5:302017-09-11T00:30:43+5:30
जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच मानव विकासच्या मोफत स्कूल बसेसचा प्रयोग पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी केला जात आहे. मात्र या बसगाड्या मर्यादित आणि आडवळणावरच्या गावांमध्येच जात असल्यामुळे अकरावी-बारावीला शिकणाºया मुख्य मार्गावरच्या गावातील हजारो विद्यार्थिनींना मोफत बस योजनेचा लाभ होत नाही. त्यामुळे त्यांना व त्यांच्या पाल्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मानव विकास मिशनअंतर्गत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना मोफत बस पास सवलत योजनेचा लाभ दिला जातो. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात सुमारे २ हजार ७८३ विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात आहे. या योजनेमुळे विद्यार्थिंनींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास फार मोठी मदतही झाली आहे. पण मुख्य मार्गावर असणाºया शेकडो गावांमध्ये मानव विकासच्या निळ्या बसेस जात नाहीत.
ज्या मार्गावर मानव विकासच्या बसेस जात नाहीत त्या मार्गावरील विद्यार्थिनींसाठी अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत प्रवासाचा लाभ विद्यार्थिनींना घेता येतो. पण तो केवळ दहावीपर्यतच्या विद्यार्थिनींनाच दिला जात असल्याने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणाºया अकरावी व बारावीतील विद्यार्थिनी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.
जिल्ह्यातील देसाईगंज हा तालुका वगळून संपूर्ण अकराही तालुक्यांचा मानव विकास मिशनमध्ये समावेश होतो. या तालुक्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने या तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक कमी असल्याचे आढळून आले. त्यातही विद्यार्थिनींच्या शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे. या बाबींचा अभ्यास केला असता आपल्या गावावरून शाळा-महाविद्यालयाची सोय असणाºया गावी जाण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना वाहतुकीचे साधन उपलब्ध झाल्यास त्यांचे शिक्षणाचे प्रमाण वाढेल ही बाब लक्षात घेऊन मानव विकास मिशनने एसटी महामंडळाला बसेस खरेदी करून दिल्या आहेत. खर्चापोटी मासिक ६४ हजार रूपये मानव विकास मिशन तर्फे एसटी महामंडळाला दिले जातात.
शिक्षणाचे प्रमाण वाढले
मानव विकास मिशनकडून भाडेतत्वावर गडचिरोली आगारात ४९ व अहेरी आगारात ४१ बसेस कार्यरत आहेत. प्रत्येक तालुक्याला सात बसेस उपलब्ध करून दिल्या असून या बसेस पंचायत समितीने निर्देशित केलेल्या मार्गांवर चालविल्या जातात. या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २ हजार ७८३ विद्यार्थिनींना होत आहे. दुर्गम भागातील गावात ही मोफत बससेवा उपलब्ध झाल्याने विद्यार्थिनींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे.
मुख्य मार्गावरच्या विद्यार्थिनींना फटका
जिल्ह्यात एकूण १४० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ या विद्यार्थिनींना दिला जात नसल्याने या विद्यार्थिनी योजनांपासून वंचित आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे.
अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनिंना मोफत बससेवेचा लाभ मिळत नसल्याने त्यांना पुढील शिक्षणासाठी शहरात किंवा कॉलेज असणाºया मोठ्या गावात जाता येत नाही. परिणामी दहावी उत्तीर्ण होऊनही विद्यार्थिनी पुढील शिक्षण सोडत आहेत. याचा गांभिर्याने विचार करणे गरजेचे झाले आहे.
अहिल्याबाई होळकर योजनेचे ४ हजार ४२१ लाभार्थी
अहिल्याबाई होळकर ही योजना राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यातील विद्यार्थिनींसाठी लागू आहे. या योजनेंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनिंना मोफत पास उपलब्ध करून दिली जाते. मानव विकास मिशनच्या बसेस ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींची वाहतूक करतात. मुख्य मार्गावर असलेल्या गावातील विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात नाही. अशा विद्यार्थिनी अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ घेतात. गडचिरोली आगारांतर्गत २ हजार ७८४ व अहेरी आगारांतर्गत १ हजार ६७३ विद्यार्थिनींची वाहतूक केली जात आहे.