राेजगारासाठी हजाराे मजुरांची माेठ्या शहरांकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:57 AM2021-01-08T05:57:25+5:302021-01-08T05:57:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जारावंडी : एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी परिसरात स्थानिक पातळीवर काेणत्याही प्रकारचा राेजगार सध्या उपलब्ध नसल्याने या भागातील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जारावंडी : एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी परिसरात स्थानिक पातळीवर काेणत्याही प्रकारचा राेजगार सध्या उपलब्ध नसल्याने या भागातील हजाराे नागरिकांनी पाेटाची खळगी भरण्यासाठी माेठ्या शहरात धाव घेतली आहे. अनेकांनी जिल्ह्याबाहेर स्थलांतर केले असून काही मजूर कामासाठी जाण्याच्या तयारीत आहेत.
केंद्र सरकारने २००५ मध्ये राेजगार हमी कायदा लागू करून राेजगार हमी याेजना अस्तित्वात आणली. मात्र, प्रशासनाच्या नियाेजनशून्यतेमुळे ‘राेहयाे’तून या भागातील मजुरांना राेजगार मिळत नसल्याचे दिसून येते. एटापल्ली तालुक्याच्या शेवटच्या टाेकावर छत्तीसगड सीमेला लागून जारावंडी परिसर आहे. या परिसरात जवळपास ९ ग्रामपंचायती असून २५ हजारांच्या आसपास लाेकसंख्या आहे. या भागात गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक समस्या कायम आहे. या परिसरातील आदिवासी व बिगर आदिवासीबांधव हाताला काम नाही म्हणून जिल्ह्याच्या बाहेर माेठ्या शहरात तात्पुरता स्थलांतरित हाेत आहे. परिणामी गावखेडे ओस पडत आहेत. यावर्षी धानाचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना जाेरदार फटका बसला. शेती व बांधकामाव्यतिरिक्त इतर काेणतेही व्यवसाय व राेजगार जारावंडी भागात उपलब्ध नाही. शेतीची कामे आटाेपली असल्याने अनेक जण शहराकडे कामासाठी धाव घेत आहेत. आपल्या मुला-मुलींसह स्थलांतरीत हाेत असल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
बाॅक्स
या शहरांकडे धाव
कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी जारावंडी परिसरातील नागरिक अंगमेहनतीची कामे करतात. शेती व माेलमजुरीचे काम करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. मात्र, आता शेतीची व मजुरीची कामे आटाेपल्याने हात रिकामे आहेत. त्यामुळे या भागातील मजूर नागपूर, मुंबई, चेन्नई, पुणे, हैदराबाद या शहरात कामाच्या शाेधात जात असल्याचे दिसून येते. नेहमी गजबजून राहणारे या परिसरातील सात ते आठ गावे आता ओस पडल्याचे दिसून येत आहे.