हजारो सिकलसेल रूग्ण गोळ्यांपासून वंचित
By admin | Published: December 28, 2015 01:43 AM2015-12-28T01:43:51+5:302015-12-28T01:43:51+5:30
राष्ट्रीय आरोग्य विभागातर्फे संपूर्ण देशात सिकलसेल या रोगाकडे गांभीर्याने पाहिले जाते.
पाच महिने उलटले : आरोग्य विभाग सुस्त
विवेक बेझलवार अहेरी
राष्ट्रीय आरोग्य विभागातर्फे संपूर्ण देशात सिकलसेल या रोगाकडे गांभीर्याने पाहिले जाते. मात्र अहेरी तालुक्यातील जवळपास तीन हजारवर सिकसेल रूग्णांना गेल्या पाच महिन्यांपासून पोलिक अॅसीड गोळ्यांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे सिकलसेल रूग्ण या गोळ्यांपासून वंचित आहेत. अशा स्थितीत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सिकलसेल रूग्णांप्रती सुस्त असल्याचे दिसून येते.
गडचिरोली जिल्ह्यात सिकलसेल रूग्णांच्या सेवेसाठी राष्ट्रीय आरोग्य विभागातर्फे कुरखेडा व गडचिरोली येथील दोन संस्थांकडे काम देण्यात आले आहे. या संस्थांमार्फत सिकलसेल रोगाविषयी जनजागृती शिबिर घेण्यात येतात. अहेरी तालुक्यात सिकलसेल रोगाविषयी जनजागृती करण्याचे चांगले काम कुरखेडाच्या स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू आहे.
सिकलसेल रूग्णांच्या सेवेसाठी अहेरी तालुक्यात एक तालुका पर्यवेक्षक तर महागाव, कमलापूर, पेरमिली, देचलीपेठा व जिमलगट्टा या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एका स्वंयसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अहेरी तालुक्यात एस. एस. पॅटर्नचे २०० पेक्षा अधिक सिकलसेल रूग्ण आहेत. या रूग्णांना लाल कार्ड देण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण तालुक्यात अडीच हजारावर ए. एस. पॅटर्नचे सिकलसेल वाहक रूग्ण आहेत. या रूग्णांना पिवळे कार्ड देण्यात आले आहेत.
सिकलसेल रूग्णांना दररोज पोलिक अॅसीडची एक गोळी घ्यावी लागते. या गोळ्या संबंधित रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक व आरोग्य उपकेंद्रांमधून मोफत वितरित केल्या जातात. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून पोलिक अॅसीड गोळ्यांचा पुरवठा अहेरी भागात करण्यात आला नाही. त्यामुळे सिकलसेल रूग्णांना प्रत्येक महिन्याला गोळ्यांअभावी रूग्णालयातून परत जावे लागत आहेत. काही सिकलसेल रूग्ण खासगी औषधी दुकानातून पोलिक अॅसीडच्या गोळ्या खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.
शासन सिकलसेल रोगाच्या निर्मुलनासाठी दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च करीत आहे. शिवाय विविध शिबिरे, जनजागृती, शाळांमध्ये मार्गदर्शन व तपासणीचे कामही केली जात आहे. मात्र सिकलसेल रूग्णांना आवश्यक असलेल्या पोलिक अॅसीडच्या गोळ्यांचा पुरवठा करण्यात न आल्याने सिकलसेल रूग्णांनी आरोग्य विभागाप्रती प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा आरोग्य विभागाने तत्काळ गोळ्यांचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.