शंभरावर ग्राम पंचायती गोदरीमुक्त होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2017 12:42 AM2017-05-25T00:42:00+5:302017-05-25T00:42:00+5:30
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात वैयक्तिक शौचालयांचे १०० टक्के काम करणाऱ्या ....
१४४ ग्रा.पं. चे प्रस्ताव शासनाकडे सादर : पाच तालुक्यांत १०० टक्के शौचालये
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात वैयक्तिक शौचालयांचे १०० टक्के काम करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १४४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव ‘गोदरीमुक्ती गाव’ म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे एप्रिलमध्ये सादर केले. राज्यस्तरीय समितीमार्फत तपासणी झाल्यानंतर त्यातील किमान ११० वर ग्रामपंचायती गोदरीमुक्त होणार आहेत.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेला देसाईगंज वगळता इतर ११ तालुक्यांसाठी एकूण ३४ हजार २४९ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने सन २०१६-१७ या वर्षासाठी दिले होते. यापैकी एप्रिल अखेरपर्यंत ११ तालुक्यात एकूण ३१ हजार २०२ शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे.
केंद्र शासनाने देशातील व महाराष्ट्रातील सर्व शहरे व गावे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन हा कार्यक्रम आखून वैयक्तिक शौचालये मोठ्या प्रमाणात बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या या निर्णयानुसार राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात ११ तालुक्यातील १५८ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तब्बल ३४ हजार २४९ शौचालये बांधकामाचे उद्दिष्ट दिले. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने ३१ मार्च २०१७ पर्यंत उद्दिष्टानुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व शौचालयांचे काम १०० टक्के पूर्ण करावे, असा अल्टीमेटम शासनाने दिला होता.
३१ मार्च २०१७ पर्यंत १०० टक्के शौचालयांचे काम करण्यासाठी प्रशासनासह गावातील ग्रामसेवक व पदाधिकारीही सक्रिय झाले होते. त्यामुळे मार्च महिन्यात शौचालयांच्या बांधकामाने सर्वत्र वेग घेतला होता. मात्र शौचालयांचे १०० टक्के काम झाले नाही. त्यामुळे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी ३० एप्रिल २०१७ पर्यंत शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली. या तारखेपर्यंत भामरागड, चामोर्शी, धानोरा, गडचिरोली व कुरखेडा या पाच तालुक्यातील शौचालयांचे १०० टक्के काम पूर्ण केले. इतर सहा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी शौचालयाचे काम १०० टक्के पूर्ण केले.
राज्यस्तरीय समितीतर्फे नोव्हेंबरमध्ये होणार गावांची तपासणी
शौचालयाचे १०० टक्के काम पूर्ण करणाऱ्या १४४ ग्रामपंचायतीना गोदरीमुक्त गाव घोषित करण्यासाठी जि.प. प्रशासनाने एप्रिल २०१७ अखेर प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. सदर ग्रामपंचायतीच्या गावांची राज्यस्तरीय समितीमार्फत नोव्हेंबर महिन्यात तपासणी होणार आहे. त्या मुल्यांकनाअंती ११० वर ग्रामपंचायती गोदरीमुक्त घोषीत होतील असा विश्वास जि.प. प्रशासनाने व्यक्त केला आहे. सदर गावांमध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. त्यामुळे या पंचायतींना पंचायत समिती व जिल्हास्तरावरील रोख पुरस्कार प्राप्त होणार आहे. गतवर्षी ४८ ग्रामपंचायती गोदरीमुक्त झाल्या होत्या.