कामगारांचे हजारो अर्ज बेवारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:11 AM2019-07-25T00:11:38+5:302019-07-25T00:12:59+5:30
अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत पंचायत समिती सभागृहात व बाजार चौकातील सभागृहात २२ जुलै रोजी कामगार नोंदणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरादरम्यान काही अर्जांची नोंद न करताच ते सभागृहातच फेकून देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत पंचायत समिती सभागृहात व बाजार चौकातील सभागृहात २२ जुलै रोजी कामगार नोंदणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरादरम्यान काही अर्जांची नोंद न करताच ते सभागृहातच फेकून देण्यात आले. हा गंभीर प्रकार असून या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे.
नोंदणी शिबिराला तालुकाभरातील जवळपास पाच हजार कामगारांनी हजेरी लावली होती. कामगारांच्या तुलनेत नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने या ठिकाणी दिवसभर मोठा गोधळ उडाला होता. कामगार नोंदणीसाठी रांगा लावून अर्ज घेतले जात होते. कामगारांची वाढती संख्या लक्षात घेवून कामगारांकडून कर्मचाऱ्यांनी अर्ज जमा केले. दिवसभरात जेवढ्या कामगारांची नोंदणी झाली तेवढे अर्ज सोबत नेले. ज्या कामगारांची नोंदणी झाली नाही. ते अर्ज तिथेच टाकून संबंधित कर्मचारी चालले गेले. यात काही अपूर्ण माहिती असलेल्या अर्जांचा समावेश आहे. २४ जुलै रोजी सांस्कृतिक सभागृहात कामगार नोंदणी अर्जांचा खच अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आला. कामगार आपला अर्ज त्या गठ्यातून शोधत होते. कामगारांना कामगार नोंदणीसाठी लागलेल्या शुल्काची पावतीसुध्दा दिली नाही. असा आरोप कामगारांनी यावेळी केला आहे.
नोंदणीसाठी सुमारे ५० किमी अंतरावरून काही कामगार आले होते. त्यांच्या नावाची नोंदणी न झाल्याने सदर कामगार परत गेले. मोठ्या परिश्रमाणे गोळा केलेले कागदपत्रेही नष्ट झाले. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे.