हजारो युवक एसआरपीएफ परीक्षेपासून राहणार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:26+5:302021-09-06T04:40:26+5:30
आष्टी (गडचिरोली) : येत्या ९ सप्टेंबरला होणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) भरती परीक्षेसाठी अधिवास प्रमाणपत्र अपलोड न केल्याने ...
आष्टी (गडचिरोली) : येत्या ९ सप्टेंबरला होणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) भरती परीक्षेसाठी अधिवास प्रमाणपत्र अपलोड न केल्याने पूर्व विदर्भातील हजारो बेरोजगार युवकांना परीक्षेपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मुलांच्या भविष्यासाठी त्यांना अधिवास प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी एक संधी देण्याची मागणी होत आहे.
येत्या ९ सप्टेंबरला परीक्षा असताना अद्यापही हॉल तिकीट उपलब्ध झालेले नाही. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरायचे होते. वेबसाइटवर अधिवास प्रमाणपत्र आहे की नाही, असा उल्लेख होता. परंतु असेल तर अपलोड करावे, अशी कोणतीही स्पष्ट सूचना त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे अनेकांनी ‘हो’ या पर्यायावर क्लिक केले. मात्र, प्रमाणपत्र अपलोड केले नाही. ज्यांनी ऑनलाइन अधिवास अपलोड केले नाही, अशांचे प्रवेशपत्र डाऊनलोड होत नाही. त्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती वाटत आहे.
(बॉक्स)
१७८ जागांसाठी २७ हजार अर्ज
महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरण्यात आले होते. भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ही भरती होती. एकूण १७८ जागांसाठी २७ हजार बेरोजगारांनी अर्ज भरलेले आहेत. २०१९ ला होणारी ही एसआरपीएफ भरती कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलली होती. यादरम्यान राज्य शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद केले. त्यानंतर जिंजर कंपनीला ही परीक्षा घेण्याची जबाबदारी देण्यात आली. या तांत्रिक समस्येबाबत शासनाने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.