तीन एकरात फुलविली केळीची बाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:38 PM2017-10-20T23:38:41+5:302017-10-20T23:38:51+5:30
शेती व्यवसाय तोट्याचा म्हणून याकडे बहुतांश शेतकरी पाठ फिरवित असले तरी महत्त्वाकांक्षा, जिद्द व मेहनतीच्या बळावर शेतकरी तोट्यातील शेतीला आर्थिक उन्नतीचे साधन बनवू पाहत आहे.
गोपाल लाजूरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेती व्यवसाय तोट्याचा म्हणून याकडे बहुतांश शेतकरी पाठ फिरवित असले तरी महत्त्वाकांक्षा, जिद्द व मेहनतीच्या बळावर शेतकरी तोट्यातील शेतीला आर्थिक उन्नतीचे साधन बनवू पाहत आहे. याचेच एक अनोखे उदाहरण म्हणजे, आरमोरी तालुक्याच्या वडधा परिसरातील बोडधा गावचे शेतकरी तथा पोलीस पाटील शंकरराव संभाजी जवादे. शंकरराव जवादे यांनी तीन एकर शेतीत केळी लागवड करून इतरांना उद्योगी शेतीचा एक नवीन मूलमंत्र दिला आहे.
शेतकरी शंकरराव जवादे यांना कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या ९ एकरच्या शेतीच्या तुकड्यात तीन एकरावर जानेवारी २०१७ मध्ये केळीची लावगड केली. तीन एकरासाठी केळीचे जी-९ टिशू कल्चरल वाण जळगाव येथून बोलाविले. ३ हजार ५०० रोपांची शेतीत लागवड केली. मशागतीसह लागवडीकरिता त्यांना जवळपास ३ लाख रूपयांवर खर्च आला. केळीच्या बागेनजीक बोअरद्वारे पाण्याची व्यवस्था केली. झाडांना पाणी करण्याकरिता त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. याकरिता त्यांना बराचसा पैसा खर्च करावा लागला. रोपांच्या सभोवताल चारही बाजूंनी शेवरी जातींची झाडे लावली आहेत. सध्या ही झाडे १५ ते २० फुटापर्यंत वाढली असून याद्वारे वादळ वाºयापासून केळीचे संरक्षण होत आहे. साडेतीन हजार झाडांपैैकी सध्या केळीची ३ हजार १५० झाडे जीवंत आहेत. १० महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच डिसेंबरपर्यंत केळीचे पीक निघणार आहे. यातून त्यांना २ लाख रूपये निव्वळ नफा अपेक्षित आहे. शंकरराव जवादे यांचे सुपुत्र सचिन जवादे हे या बागेची नियमित निगा राखत आहेत. तोट्याची शेती म्हणून शेतकºयांनी हताश न होता उद्योगी शेतीकडे वळावे, असे ते आनंदाने सांगतात.
केळी पिकाची मशागत व देखभाल
केळी पिकासाठी शेतकरी जवादे यांनी तीन एकराच्या जागेचे सपाटीकरण ट्रॅक्टरमार्फत केले. त्यानंतर तीन एकरात दहा ट्रॅक्टर शेणखत टाकून रोटावेटरने माती बारीक केली. एक ते दीड फूट उंच उभ्या पाळी तयार केल्या. त्यानंतर ५ बाय ५.५ फुटावर केळीची छोटी रोपे लावली. यावेळी बुरशीनाशकाचा वापर केला. उन्हाळ्यात चार दिवसाआड पाणी दिले. तसेच पोटॅश, युरिया, मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा, विद्राव्य खते नियमित दिली. त्यानंतर लागवडीपासून सात ते साडेसात महिन्यात केळीला घड आले. तीन एकरातील बागेत कचºयाची काढणी करण्यापासून ते रोपट्यांची निगा राखण्याचे काम शेतकरी कुटुंब करीत आहे.
शेतकरी अद्यापही पारंपरिक शेतीच्या जोखडातून बाहेर पडला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक अथवा निर्वाहाची शेती तोट्याची आहे. त्यामुळे शेतकºयांनी व्यावसायिक शेतीकडे वळल्यास आर्थिक नफा अधिक मिळू शकतो. परंतु याकरिता पैेसा व मेहनतीचीही जोड आवश्यक आहे.
- शंकरराव जवादे, शेतकरी तथा पोलीस पाटील, बोडधा