तेंदूपत्ता कंत्राटदारांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 02:22 AM2017-05-29T02:22:22+5:302017-05-29T02:22:22+5:30
२२ मे रोजी सोमवारला आलापल्ली येथे तिन तेंदूपत्ता कंत्राटदारांना नक्षल्यांना पैसे पुरवित असल्याच्या कारणावरून
७५ लाख केले होते जप्त : नक्षल्यांना खंडणी देत असल्याचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : २२ मे रोजी सोमवारला आलापल्ली येथे तिन तेंदूपत्ता कंत्राटदारांना नक्षल्यांना पैसे पुरवित असल्याच्या कारणावरून ७५ लाख रूपयांच्या रकमेसह अटक केली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी आरोपींकडे आणखी चौकशी केली असता आरोपींनी मौजा बोटलाचेरु येथे लपविलेले १ कोटी १ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. या तिघांनाही न्यायालयाने रविवारी २८ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर रविवारी न्यायालयात हजर केले असता पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
प्राणहिता पोलीस मुख्यालयातील विशेष अभियान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मिलन कुरकुटे व त्यांचे पथक नक्षलविरोधी अभियान राबूवन परत येत असताना २२ मे रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास पहाडीया तुळशिराम तापला (३५), रवी मलय्या तनकम (४५) व नागराम समय्या पुट्टा (३७) यांना अटक केली होती. आरोपींविरूध्द युएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी पहाडीया तुळशीराम तापला, रवि मलय्या तनकम व नागराज समय्या पुट्टा या आरोपींकडून आतापर्यंत १ कोटी ७६ लाख इतकी रोकड जप्त केली.
मात्र बोटलाचेरू येथून पोलिसांनी केलेली १ कोटी १ लाखाची रक्कम ही वेलगूर, किष्टापूर ग्राम पंचायतीअंतर्गत १२ गावातील तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांच्या मजुरीची होती, असा खुलासा ग्रामस्थांनी अहेरी येथे पत्रकार परिषद घेऊन केला होता.