अपघाताच्या धक्क्याने गर्भातील बाळ दगावले; सहा महिने उदरात वाढवलेला पोटचा गोळा गमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 10:58 AM2023-02-04T10:58:34+5:302023-02-04T11:01:41+5:30

या अपघातात घटनास्थळीच दोन जण दगावले

three died in a accident on korchi kurkheda road | अपघाताच्या धक्क्याने गर्भातील बाळ दगावले; सहा महिने उदरात वाढवलेला पोटचा गोळा गमावला

अपघाताच्या धक्क्याने गर्भातील बाळ दगावले; सहा महिने उदरात वाढवलेला पोटचा गोळा गमावला

Next

कोरची (गडचिरोली) : आई होण्यासाठी एका स्त्रीला आपल्या उदरात वाढणाऱ्या गर्भाला किती जपावे लागते हे तिलाच माहीत असते. प्रत्येक गर्भवती महिला स्वत:सोबत पोटातील त्या गोळ्यालाही जीवापाड जपत असते. मात्र दुर्दैवाने गुरुवारी कोरची-कुरखेडा महामार्गावर झालेल्या अपघाताच्या धक्क्याने एका गर्भवतीला तिच्या पोटातील सहा महिन्यांच्या गर्भाला गमवावे लागले. या अपघातात घटनास्थळीच दोन जण दगावले होते. पोटातील गर्भाच्या रूपाने तिसराही जीव गेला आहे.

या अपघातात कोरची-कुरखेडा महामार्गावर प्रवासी घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या क्रूझर या प्रवासी गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चेंडूसारखे उडवल्यानंतर ती क्रूझर दोन कोलांट्या खाऊन लगतच्या शेतात जाऊन पडली. त्यामुळे दुचाकीस्वारासह क्रुझरमधील एका प्रवासी महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याशिवाय आठ प्रवासी जखमी झाले. त्या जखमींमध्ये सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या अंजना रोशन मडावी (२६, रा. पड्यालजोब) या महिलेचाही समावेश होता. सर्व जखमींना कोरची पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर गर्भवती महिलेसह इतर दोन जखमींना पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविण्यात आले.

अंजनाच्या पोटात प्अरचंड वेदना असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयातून गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले. सोनोग्राफी केली असता सहा महिन्यांचे ते गर्भरूपी बाळ मृत झाले होते. डॉक्टरांनी मातेला वाचविण्यासाठी पोटातील मृत गर्भाला बाहेर काढले. बाळ गमावल्याचा धक्का सहन करत ती माता उपचार घेत आहे.

दुसरीकडे डोक्याला मार लागलेला सहा महिन्यांचा युग नामदेव तुलावी आणि त्याची आई पूजा नामदेव तुलावी (२५) यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास कोरची पोलिस स्टेशनचे निरीक्षक अमोल फडतरे, सहायक निरीक्षक गणेश फुलकवर करीत आहेत.

‘ती’ मृत महिला गोंदिया जिल्ह्यातील

या अपघातात क्रुझरमधील ज्या प्रवासी महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तिची ओळख गुरुवारी रात्री पटली. त्या महिलेचे नाव मानकीबाई संताराम सोनवाने (३७, रा. येळदा, पो. पळसगाव, ता. मोरगाव/अर्जुनी, जि. गोंदिया) असे आहे. तिचे माहेर कोरची तालुक्यातील कोहका हे आहे. ती माहेरी पाहुणपणाला आली होती. त्यानंतर कोचीनारा मंडईला जाऊन तेथूनच सासरी जाण्यासाठी क्रुझर वाहनात बसली होती. पण याचवेळी हा अपघात झाला आणि त्यात काळाने तिला हिरावून घेतले.

Web Title: three died in a accident on korchi kurkheda road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.