तीन दारुडे शिक्षक निलंबित, मद्यप्राशन करुन शाळेत यायचे गुरुजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 07:53 PM2020-03-19T19:53:57+5:302020-03-19T19:54:49+5:30
या तिन्ही शिक्षकांचे शाळांना पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांनी भेट दिली असता हे तिन्ही शिक्षक मद्य प्राशन करून शाळेत येत असल्याचे दिसून आले.
कोरची (गडचिरोली) : मद्य प्राशन करून शाळेत येणाऱ्या तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाºया तीन शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केले आहे. रानगट्टा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मुरारी पडोटी, आंबेखारी जिल्हा परिषद शाळेचे टिकाराम दौलत पुडो व जांभळी शाळेचे शिक्षक रामू दुलाराम हलामी असे निलंबित केलेल्या शिक्षकांचे नावे आहेत.
या तिन्ही शिक्षकांचे शाळांना पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांनी भेट दिली असता हे तिन्ही शिक्षक मद्य प्राशन करून शाळेत येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिघांवरही निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित कालावधीत नारायण पडोटी यांना पंचायत समिती गडचिरोली, टिकाराम पुडो यांना पंचायत समिती आरमोरी व दुलाराम हलामी यांना पंचायत समिती वडसा येथे नेमणूक देण्यात आली आहे. मागील काही दिवसात कोरची तालुक्यातील चार शिक्षक निलंबित झाले आहेत.
या सर्व शिक्षक मद्य प्राशन करण्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. यावरून दुर्गम भागात कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इतरही तालुक्यांमध्ये काही शिक्षक मद्य प्राशन करून शाळेत जातात. तसेच अनेक दिवस शाळेत जात नाही. त्यामुळे अशा शिक्षकांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.