अखेर रात्रीच्या अंधारात गडचिरोलीचे तीन हत्ती गुजरातकडे रवाना; नागरिकांमध्ये असंतोष

By मनोज ताजने | Published: September 2, 2022 06:15 PM2022-09-02T18:15:19+5:302022-09-02T18:19:35+5:30

त्या तिघांनाही मध्यरात्री कंटेनर मध्ये टाकून नेण्यात कुणालाही पत्ता लागू न देता गुजरातकडे रवाना करण्यात आले. 

three elephants of Gadchiroli left for Gujarat in the dark of night Despite Strong Protest by people | अखेर रात्रीच्या अंधारात गडचिरोलीचे तीन हत्ती गुजरातकडे रवाना; नागरिकांमध्ये असंतोष

अखेर रात्रीच्या अंधारात गडचिरोलीचे तीन हत्ती गुजरातकडे रवाना; नागरिकांमध्ये असंतोष

googlenewsNext

आलापल्ली (गडचिरोली) : आलापल्ली वनविभागातील पातानील येथे असलेले दोन हत्ती गुरुवारच्या रात्री गुपचूपपणे गुजरात मधील जामनगरच्या दिशेने रवाना करण्यात आले. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याशिवाय कमलापूर येथील ८ पैकी ४ हत्तीही नेण्याचा आदेश प्राप्त झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

आलापल्ली वनपरिक्षेत्रात गेल्या ८० वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हत्तीचे वास्तव्य आहे. हे हत्ती आलापल्ली वन विभागाचे भूषण होते. एकेकाळी घनदाट जंगल असताना याच हत्तीकडून लाकूड ओढणीची कामे केली जात होती. पातानिल येथे दोन नर आणि एक मादी हत्ती होते. त्या तिघांनाही मध्यरात्री कंटेनर मध्ये टाकून नेण्यात कुणालाही पत्ता लागू न देता गुजरातकडे रवाना करण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार शासकीय आदेशानुसार जयलक्ष्मी 75 वर्ष (मादी ) जगदीश 75 (नर ) आणि विजय 21 वर्ष (तरुण नर ) यांना मध्यरात्री 2 च्या दरम्यान गुपचूप रवाना करण्यात आले. यापूर्वीच आलापल्ली आणि कमलापूर येथील हत्ती जामनगरला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण  येथील नागरिक आणि सामाजिक संस्थासहित आमदार, खासदार आणि माजी मंत्री यांनीसुद्धा जनभावना लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत हत्ती नेऊ देणार नाही अशी ग्वाही दिली होती. पण सगळीकडे सार्वजनिक  गणपतीच माहोल सुरू असताना त्याचा गैरफायदा घेऊन रात्रीच्या अंधारात हत्ती गुपचूप नेण्यात आले.

खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत उपवनसंरक्षक राहुलसिंग तोलिया यांनी केवळ वयस्कर हत्ती पाठविण्यासंदर्भात पत्र आले आहे असे सांगितलं होते. पण आज दोन वयस्कर हत्तीसोबतच एक विजय नावाचा तरुण हत्ती पण जामनगरला नेला. यावरून हत्ती नेण्यासाठी राज्य शासन आणि वनविभागाची मूक संमती होती हे दिसून येते. नागरिकांचा प्रचंड विरोध असताना हत्ती नेले जात असल्याने आता लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: three elephants of Gadchiroli left for Gujarat in the dark of night Despite Strong Protest by people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.