ग्रामसभेने वृक्षतोड थांबवून जप्त केले एफडीसीएमचे तीन ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:26 AM2018-03-10T01:26:47+5:302018-03-10T01:26:47+5:30
कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर येथील ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी एफडीसीएमच्या मार्फत केली जाणारी वृक्षतोड थांबवून तीन ट्रॅक्टर शुक्रवारी जप्त केले आहेत.
ऑनलाईन लोकमत
वैरागड : कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर येथील ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी एफडीसीएमच्या मार्फत केली जाणारी वृक्षतोड थांबवून तीन ट्रॅक्टर शुक्रवारी जप्त केले आहेत.
पेसा कायद्याअंतर्गत वने, वन्यजीव प्राणी व जैवविविधता यावर प्रतिकूल परिणाम करणारी कोणतीही कृती थांबविण्याचा ग्रामसभेला अधिकार आहे. मागील चार वर्षांपासून पेसा अंतर्गत येणाºया गावांच्या सीमेतील जंगलाची मोठ्या प्रमाणात तोड केली जात आहे. कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर, सावलखेडा, वाढोणा, देसाईगंज तालुक्यातील चिखली रिठ, आरमोरी तालुक्यातील सालमारा, वैरागड या वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगलातील वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. नियामनुसार ज्या जंगलाची घनता ४० टक्के पेक्षा कमी आहे, अशा जंगलातील फक्त १० टक्के परिपक्व वृक्ष तोडण्याचा वन विकास महामंडळाला अधिकार असताना ज्या ठिकाणी वृक्षांची घनता सर्वाधिक आहे, अशा जंगलाची एफडीसीएमकडून १०० टक्के वृक्षतोड केली जात आहे. यामुळे संपूर्ण जंगल साफ होत आहे. विशेष म्हणजे मोह, बेहडा, चार, टेंभूूर या गौण वनोपजाची सरसकट कत्तल चालू असल्याने घनदाट जंगले ओसाड माडरान झाली आहेत.
कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, भगवानपूर येथील नागरिकांनी उपवनसंरक्षक देसाईगंज, आ. कृष्ण गजबे, तहसीलदार, पोलीस स्टेशन कुरखेडा यांना संपूर्ण गावकºयांच्या स्वाक्षरींचे निवेदन देऊन आम्ही एफडीसीएमची वृक्षतोड थांबवित आहोत, तरी आपण हजर राहावे, असे कळविले होते. नियोजनाप्रमाणे ९ मार्च रोजी शिरपूर व भगवानपूर येथील गावकºयांनी लाकडे वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त केले. सदर ट्रॅक्टर ग्रामपंचायत शिरपूर येथे जमा करण्यात आले. नागरिकांमध्ये रोष दिसून येत होता.
एफडीसीएम करत आहे जंगल सपाट
नियमानुसार ४० टक्के कमी घनता असलेल्या जंगलातील फक्त १० टक्केच परिपक्व झालेले वृक्ष तोडण्याचा अधिकार एफडीसीएमला असताना वन विकास महामंडळ संपूर्ण वृक्षांची सरळसरळ कत्तल करून जंगल नष्ट करीत आहे. यावरून एफडीसीएम जंगलाचे संरक्षण करीत नसून जंगल नष्ट करण्याचे काम करीत आहे. यामध्ये मोठमोठ्या अधिकाºयांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी रामकृष्ण कावळे, प्रेमदास गावडे, रवींद्र मडावी, लोकेश लोंढे, धनराज हलामी, होमराज मस्के यांनी केली आहे.
नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर
परिसरात असलेली मोह, टेंभूर, चार, बेहडा यासारखी झाडे स्थानिक नागरिकांनी संरक्षण करत वाढविली आहेत. याच झाडांवर आता एफडीसीएम आपला अधिकार सांगून सदर झाडे तोडीत आहे. ही झाडे आजपर्यंत स्थानिक नागरिकांना जवळपास चार महिने रोजगार उपलब्ध करून देत होती. मात्र एफडीसीएमने याच झाडांवर कुऱ्हाड चालविणे सुरू केले आहे. अत्यंत मौल्यवान व रोजगार देणारी झाडे एफडीसीएमतर्फे कापली जात आहेत. हे सर्व अवैध असताना एफडीसीएमचे अधिकारी मात्र नियमानुसारच झाडांची कत्तल करीत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे एफडीसीएमच्या कार्यप्रणालीबाबत शंका उपस्थित केली जात आहे.