थ्री-जी सेवेचा विस्तार रखडला

By admin | Published: November 17, 2014 10:53 PM2014-11-17T22:53:30+5:302014-11-17T22:53:30+5:30

स्मार्ट फोनच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आल्याने नागरिक स्मार्ट फोन खरेदी करीत आहेत. त्याचबरोबर थ्री-जी सेवेची मागणी वाढत चालली असतांनाच जिल्ह्यात मात्र

Three-G service extension extended | थ्री-जी सेवेचा विस्तार रखडला

थ्री-जी सेवेचा विस्तार रखडला

Next

गडचिरोली : स्मार्ट फोनच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात आल्याने नागरिक स्मार्ट फोन खरेदी करीत आहेत. त्याचबरोबर थ्री-जी सेवेची मागणी वाढत चालली असतांनाच जिल्ह्यात मात्र थ्री-जी सेवेचे विस्तारिकरण रखडले आहे. केवळ गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज व अहेरी या चारच ठिकाणी थ्री-जी सेवा कार्यरत आहे. उर्वरित आठ तालुक्यांमधील नागरिक मात्र थ्री-जी सेवेपासून वंचित आहेत.
मोबाईल ही केवळ चैनीची वस्तू राहीलेली नसून अत्यावश्यक गरज बनली आहे. मोबाईल व इंटरनेटमुळे संपूर्ण जग जवळ आले असून या दोन्ही साधनांमुळे कामात गतीमानता येण्याबरोबरच बराचसा खर्च कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांकडे मोबाईल दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे उत्पन्न इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असले तरी मोबाईलधारकांची संख्या मात्र निश्चितच कमी नाही. १८ वर्षांच्या युवकांपासून ते ८० वर्षांच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाकडेच मोबाईल दिसून येतो.
थ्री-जी सेवेचा वापर केवळ स्मार्टफोनमध्येच केला जातो. स्मार्टफोनची किंमत चार वर्षापूर्वी प्रचंड असल्याने सर्वसामान्य नागरिक सदर मोबाईल खरेदी करीत नव्हते. प्रत्येकाकडे साधे मोबाईलच आढळून येत होते. या मोबाईलचा वापर केवळ व्हाईस कॉल व मेसेज करण्यापुरताच मर्यादित होता. ही सेवा टू-जीच्या माध्यमातून उपलब्ध होते. मोबाईल कंपन्यांमध्ये असलेल्या तीव्र स्पर्धेमुळे स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड प्रमाणात कमी झाल्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही स्मार्टफोनचा वापर करू लागला आहे. स्मार्टफोनमध्ये इंटरनेट समाविष्ट राहतो. इंटरनेट वेगाने काम करण्यासाठी थ्री-जी सेवा आवश्यक आहे.
बीएसएनएलने गडचिरोली येथे चार वर्षापूर्वी थ्री-जी सेवा सुरू केली. त्यानंतर देसाईगंज, आरमोरी व अहेरी या चार शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने थ्री-जी सेवा सुरू केली आहे. सिरोंचा येथे मागील दोन वर्षांपासून थ्री-जी तंत्रज्ञान लावण्यात आले आहे. मात्र सदर सेवासुद्धा सुरू करण्यात आलेली नाही. आलापल्ली, चामोर्शी, सिरोंचा, कुरखेडा, आष्टी ही प्रगत असलेली शहरे आहेत. या शहरांमध्ये हजारो स्मार्टफोनधारक असून इंटरनेटचा वापर करतात. त्यामुळे या ठिकाणांसह कोरची, एटापल्ली, मुलचेरा, धानोरा या तालुकास्थळावरील अनेक नागरिक स्मार्टफोनचा वापर करतात. या ठिकाणी थ्री-जी सेवा सुरू केल्यास याचा फायदा नागरिकांना होण्याबरोबरच बीएसएनएलचे उत्पन्न वाढीसही मदत होईल.
उत्पन्न कमी असल्याचे कारण पुढे करीत खासगी मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्या गडचिरोली जिल्ह्यात टॉवर उभारण्यास फारशा उत्सुक नाहीत. त्यामुळे इतर खासगी कंपन्यांचा कव्हरेज नसल्याने सर्वाधिक ग्राहक बीएसएनएलचेच आढळून येतात. बीएसएनएल ही सरकारी कंपनी असल्याने वेळप्रसंगी तोटा सहन करून नागरिकांना सेवा देणे बंधनकारक आहे. त्यानुसार बीएसएनएलचे ८६ टॉवर जिल्ह्यात कार्यरत आहेत. नवीन ३७ टॉवर उभारण्यास केंद्र शासनाने परवानगी दिली असून सदर टॉवर एक वर्षाच्या आतमध्ये उभारले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या आणखी वाढण्यास मदत होईल. टॉवर बरोबरच थ्री-जी सेवेचाही विस्तार करण्याची मागणी जिल्ह्यातील मोबाईलधारकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Three-G service extension extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.