तीन जहाल नक्षल्यांना ठोकल्या बेड्या; भामरागडच्या जंगलात कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 10:33 AM2023-09-11T10:33:40+5:302023-09-11T10:34:45+5:30

हाेते सहा लाखांचे बक्षीस

Three Jahal Naxals were shackled; Action taken in the forest of Bhamragarh | तीन जहाल नक्षल्यांना ठोकल्या बेड्या; भामरागडच्या जंगलात कारवाई

तीन जहाल नक्षल्यांना ठोकल्या बेड्या; भामरागडच्या जंगलात कारवाई

googlenewsNext

गडचिरोली : पोलिसांवर हल्ले, सरकारी मालमत्तेचे नुकसान करून रस्ते व इतर कामांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या तीन नक्षल्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम ताडगाव व कियर जंगलात ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, तिन्ही नक्षल्यांची ९ सप्टेंबरला तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी झाली.

सरजू ऊर्फ छोटू बंडू महाका (वय २८), मधू ऊर्फ अनू महारु कुमोटी (वय २३ वर्षे, दोघेही रा. हलेवारा ता. भामरागड), अशोक लाला तलांडी (वय ३०, रा. पासेवाडा, ता.कुडरू जि. बिजापूर, छत्तीसगड) अशी त्यांची नावे आहेत. भामरागड हद्दीतील तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरात विशेष पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते. यावेळी त्यांना वाँटेड नक्षलवादी सरजू ऊर्फ छोटू महाका व मधू ऊर्फ अनू कुमोटी हे दोघे जंगलात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून तेथे शोधमोहीम राबवून दोघांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर पथकाने भामरागड हद्दीतील कियर जंगल परिसरात अशोक तलांडी या छत्तीसगडच्या नक्षल्याच्या मुसक्या आवळल्या. तिन्ही नक्षलवाद्यांवर शासनाने प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. तिघांनाही भामरागड न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

चकमकीत सहभाग

सरजू महाका हा २०१० मध्ये नक्षली चळवळीत आला. २०१८ मध्ये त्याने चळवळ सोडली. या दरम्यान दोन निरपराध व्यक्तींचे खून, पोलिसांशी चकमक, विसामुंडीजवळ पुलाच्या कामावरील ठेकेदाराचा जेसीबी व सिमेंट मिक्सर जाळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मधू कुमोटी हा २०१५ मध्ये सदस्य म्हणून नक्षली दलममध्ये सामील झाला. दोन निरपराध व्यक्तींच्या खुनासह तीन चकमकीत त्याचा सहभाग होता. अशोक तलांडी हा छत्तीसगडच्या सँड्रा दलममध्ये भरती झाला होता. दोन वर्षांपासून त्याने चळवळ सोडली होती. मात्र, अधूनमधून नक्षल्यांना तो प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष सहकार्य करत असे.

गडचिरोली पोलिसांनी नक्षल्यांविरोधात नेहमीच प्रभावी कारवाया राबविल्या. त्यामुळे २०२२ पासून आतापर्यंत ७० नक्षल्यांना अटक करण्यात यश आले. नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावण्यास पोलिस सज्ज आहेत.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली.

Web Title: Three Jahal Naxals were shackled; Action taken in the forest of Bhamragarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.