पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून तिघांची छत्तीसगडमध्ये हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 10:39 AM2023-11-03T10:39:10+5:302023-11-03T10:40:49+5:30

माओवाद्यांचे कृत्य : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी थरार

Three killed in Chhattisgarh by naxals on suspicion of being police informer | पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून तिघांची छत्तीसगडमध्ये हत्या

पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून तिघांची छत्तीसगडमध्ये हत्या

गडचिरोली : महाराष्ट्र पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून तीन व्यक्तींची माओवाद्यांनी हत्या केल्याची खळबळजनक घटना २ नोव्हेंबरला छत्तीसगडमध्ये उघडकीस आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार दौऱ्याच्या पूर्वसंध्येला गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात हे थरारक हत्याकांड घडले. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तिघांची हत्या करून माओवाद्यांनी छत्तीसगड पोलिसांना आव्हान दिले आहे.

कुल्ले कतलामी (३५), मनोज कोवाची (२२) व डुग्गे कोवाची (२७, सर्व रा.मोरखंडी जि.कांकेर) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. गडचिरोलीतील एटापल्ली तालुक्याच्या सीमेलगत छत्तीसगडमधील छोटेबेठिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना २ नोव्हेंबरला उघडकीस आली. घटनास्थळी पोलिसांना माओवाद्यांचे पत्रक आढळून आले. त्यात हे तिघे महाराष्ट्र पोलिसांचे खबरी असल्याचा दावा केला आहे. गडचिरोलीतील नक्षलविरोधी अभियानच्या सी - ६० पथकासाठी हे तिघे खबरी म्हणून काम करत होते, असा माओवाद्यांना संशय होता, त्यातून त्यांना संपविण्यात आले.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, २ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कांकेर जिल्ह्यात नियोजित प्रचार दौरा होता. त्याआधीच माओवाद्यांनी तिघांची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. छत्तीसगड पोलिसांनी या हत्याकांडाबाबत तपास सुरू केला असून, पंतप्रधानांनी कडक सुरक्षा यंत्रणेत नियोजित प्रचार दौरा केला. यावेळी फेरी काढून त्यांनी सभेला संबोधित देखील केले.

महाराष्ट्र पोलिसांच्या रेकॉर्डवर खबरीच नाहीत

दरम्यान, पोलिस सूत्रांनुसार महाराष्ट्र पोलिसांच्या रेकाॅर्डवर कुठल्याही खबरींची नोंद नाही. नक्षल्यांबाबत गोपनीय माहिती पुरविणारे कुठलेही खबरी सध्या सक्रिय नाहीत. तथापि, या घटनेत मृत्यू पावलेले तीनही व्यक्ती हे छत्तीसगडमधील असून, ही घटनाही छत्तीसगडमध्येच घडलेली आहे. त्यामुळे मृत व्यक्ती महाराष्ट्र पोलिसांचे खबरी असल्याचा संशयातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

Web Title: Three killed in Chhattisgarh by naxals on suspicion of being police informer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.