अवैध दारू विक्रेत्यांकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:39 AM2021-04-09T04:39:09+5:302021-04-09T04:39:09+5:30
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मोहटोला येथील अवैध दारू विक्रेता संजय तुकाराम बुल्ले याच्याकडून दुचाकी वाहनासह १ लाख २९ हजार रुपयांचा ...
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील मोहटोला येथील अवैध दारू विक्रेता संजय तुकाराम बुल्ले याच्याकडून दुचाकी वाहनासह १ लाख २९ हजार रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला, तसेच शहरातील आंबेडकर वाॅर्डातील दारू विक्रेता जीवन मनोज पिल्लेवान याच्याकडून मोहाची गावठी दारू (किंमत ६ हजार रुपये) जप्त करण्यात आली. तसेच भगतसिंग वाॅर्ड येथील चंदन बकाराम खरकाटे याच्याकडून २ हजार १०० रुपयांचा देशी दारूसाठा जप्त करण्यात आला. आंबेडकर वॉर्डातील विजय दिलीप पिल्लेवान याच्याकडून मोहा दारू, गांधी वाॅर्डातील विपुल दीपक कावळे याच्याकडून दुचाकी वाहनासह ५६ हजारांचा देशी दारूसाठा, कोरगाव येथील राकेश दादाजी राऊत, विसोरा येथील राहुल जयराम धाकडे व शहरातील गांधी वाॅर्डातील निर्मल प्रेमसिंग मक्कड याच्याकडून फ्रिजसह एकूण १ लाख १४ हजार रुपयांचा दारूसाठा, तथा कोरेगाव येथील माणिक प्रेमदास रामटेके याच्याकडून ५ हजार ६०० रुपयांचा देशी दारूसाठा जप्त करण्यात आला. यातील आरोपी फरार आहे.
या संपूर्ण कारवाईत ३ लाख १३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपीविरुद्ध देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख व कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात देसाईगंज ठाण्याचे पोलीस निरीक्षक डाॅ. विशाल जयस्वाल यांच्या पथकाने केली.
याशिवाय नगर परिषदेच्यावतीने विनामास्क असलेल्या १३ इसमांवर कारवाई करून २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. आता लवकरच विनापरवाना वाहन चालविणाऱ्या, अल्पवयीन आणि स्टंटबाज दुचाकीस्वारांवर धडक कारवाई करून त्यांच्या पालकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे डॉ. जयस्वाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.