गडचिरोलीत तेलंगणात तस्करी होणारे तीन लाखांचे सागवान जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 10:47 AM2018-01-03T10:47:05+5:302018-01-03T10:49:09+5:30
सिरोंचा वनविभागातील मौल्यवान सागवानाची तेलंगणात तस्करी करण्याचा प्रयत्न वनविभाग व पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून हाणून पाडण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : सिरोंचा वनविभागातील मौल्यवान सागवानाची तेलंगणात तस्करी करण्याचा प्रयत्न वनविभाग व पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून हाणून पाडण्यात आला. यात ६.४७ घनमीटरचे १११ नग सागवान लाकूड व ट्रक जप्त करुन पाच आरोपींनाही अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी रात्री गस्तीदरम्यान करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्यातील वनसंपदेची तेलंगणा राज्यात होणारी तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट, छत्तीसगड व तेलंगणातील वनाधिकाऱ्यांची आंतरराज्यीय बैठक गेल्याच महिन्यात झाली. त्याचे फलित म्हणून ही कारवाई करण्यात यश आले. सिरोंचा वनविभागाचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण (भावसे) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वनाधिकारी शंकर गाजलवार व वनपरिक्षेत्र अधिकारी विनायक नरखेडकर यांनी ही कारवाई केली.मर्रीगुडम जंगल परिसरातून कापलेल्या सागवानाचे १११ नग ट्रक (एपी ३६, एक्स ५४३६) मधून तेलंगणातील परिकोटा येथे नेले जात होते. वनविभागाच्या पथकाने गस्तीदरम्यान ट्रक अडवून तपासणी केलीे.
टोळीतील पोचम रामय्या गावडे रा.मर्रीगुडम याच्यासह तेलंगणा राज्यातील सदानंद समय्या बंडूला रा.परिकोटा, श्रावणकुमार लक्ष्मीनर्सय्या कटकोजी (रा.हन्मकोंडा), गुंडेबोईना रामस्वामी रा.पंबापूर आणि तैशेट्टी समय्या राजलिंगू रा.कमनापूर या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. उर्वरित तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान सर्व आरोपींवर मंगळवारी (दि.२) वनकायद्यानुसार गुन्हा दाखल करून वनकोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले.
मोबाईलवरून मिळविणार माहिती
ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर तसेच टॉवर डम्प अॅनालिसिस करूनइतर आरोपींचा शोध लावला जाणार आहे. या कारवाईनंतर सिरोंचा वनविभागाकडून जंगलातील गस्त वाढविण्यात आली आहे.