एकाच कुटुंबातील तिघांची अंत्ययात्रा; गावकऱ्यांच्या आश्रूंचा बांध फुटला
By संजय तिपाले | Published: September 26, 2023 03:04 PM2023-09-26T15:04:01+5:302023-09-26T15:05:49+5:30
लोहवाहतुकीच्या ट्रकखाली चिरडल्याने मृत्यू: नातेवाईकांचा आक्रोश, गावावर शोककळा
गडचिरोली : तहसील कार्यालयातून गावी परतण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या चौघांना सुरजागडच्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याची घटना २५ सप्टेंबरला चामोर्शी येथे घडली होती. यात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला तर एकावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, तिन्ही मृतांवर मार्कंडा येथील वैनगंगा नदीकाठावर २६ सप्टेंबरला दुपारी अंत्यसंस्कार करण्यत आले. नातेवाईकांच्या आक्रोशाने गावकऱ्यांच्या आश्रूंचा बांध फुटला.
मार्कंडा येथील जनध्यालपवार कुटुंबातील चौघे जण तहसील कार्यालयात कामानिमित्त गेले होते. काम आटोपल्यावर चौघे दुचाकीवरुन (एमएच ३३ के-३१३५) परत निघाले. गडचिरोली रोडवर सुरजागडहून आलेल्या भराव ट्रकने (सीजी ०८ एयू- ९०४५) त्यांना चिरडले. यात प्रियंका गणेश जनध्यालवार (२४), रुद्र गणेश जनध्यालवार (५) व भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) हे तिघे ठार झाले तर नरेंद्र जनध्यालवार (५२) हे जखमी आहेत.
तीन आठवड्यांपूर्वीच जंनध्यालवार कुटुंबातील गणेश यांचा मृत्यू झाला होता. या दु:खातून कुटुंब सावरलेही नव्हते तोच त्यांचा मुलगा रुद्र व पत्नी प्रियंका यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर तिन्ही मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आले. निवासस्थानापासून वैनगंगा नदीपर्यंत एकाचवेळी तिघांची अंत्ययात्रा निघाली. हृदय हेलावणाऱ्या या दु:खद प्रसंगामुळे गावावर शोककळा पसरली. नातेवाईकांनी आक्रोशकेल्याने गावकऱ्यांना आश्रू अनावर झाले. अंत्यविधीसाठी मोठी गर्दी झाली होती.
घरात फक्त सासरे, तेही अंथरुणाला खिळून
अपघातातील मयत भावना व प्रियंका या चुलत सासू- सून होत्या. भावना यांचे पती नरेंद्र हे अपघातात गंभीर जखमी असून उपचार सुुरु आहेत. भावना यांना एक मुलगा, एक मुलगी आहे तर प्रियंका व त्यांचा मुलगा रुद्रच्या मृत्यूनंतर आता घरात केवळ त्यांचे सासरे लोमेश आहेत. तेदेखील अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळून आहेत.