आणखी तीन लिपिकांना अटक
By admin | Published: October 5, 2016 02:13 AM2016-10-05T02:13:23+5:302016-10-05T02:13:23+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत २२० शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणाच्या पोलीस तपासाने गती घेतली आहे.
बोगस शिक्षक बदली प्रकरण : पाचही आरोपींना शुक्रवारपर्यंत कोठडी
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत २२० शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणाच्या पोलीस तपासाने गती घेतली आहे. गडचिरोलीचे पोलीस निरिक्षक विजय पुराणिक यांच्या नेतृत्वात सदर प्रकरणातील आणखी तीन आरोपी लिपिकांना गडचिरोली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यामध्ये प्रमोद सहारे, विनोद अल्लुरवार व सुनिल लोखंडे यांचा समावेश आहे.
यापूर्वी सदर बोगस बदली प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाचे लिपीक नचिकेत शिवनकर व विजय सिंग या दोघांना अटक केली होती. सदर प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे. गडचिरोली पोलिसांनी सदर पाचही आरोपींना मंगळवारी जिल्हा व प्रमुख सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या पाचही आरोपींना ७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस निरिक्षक विजय पुराणिक यांनी लोकमतशी बोलताना दिली. आता पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य, महिला बाल कल्याण विभाग व एटापल्लीला होते कार्यरत
शिक्षकांच्या बोगस बदली प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी प्रमोद सहारे हे सध्या महिला बाल कल्याण विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत आहे. सुनिल लोखंडे हे आरोग्य विभाग जिल्हा परिषद गडचिरोली तर तिसरे आरोपी विनोद अल्लुरवार हे एटापल्ली पंचायत समितीत सध्या कार्यरत आहे. बदली घोटाळा ज्या वर्षी झाला, त्यावर्षी ही मंडळी पदाधिकाऱ्यांकडे स्वीय सहायक व शिक्षण विभागात कार्यरत होती.