तीन नक्षलींचा खात्मा, पोलिसांवर हल्ला केल्यानंतर गडचिरोलीत चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 05:01 AM2018-04-04T05:01:59+5:302018-04-04T05:01:59+5:30
घनघोर धुमश्चक्रीत पोलिसांनी मंगळवारी सकाळी नक्षलींचा डिव्हिजन कमांडर सुनील कुळमेथे, त्याची पत्नी स्वरूपासह अन्य एका महिला नक्षलीला कंठस्नान घातले. सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात सकाळी दहाच्या सुमारास ही चकमक झाली.
गडचिरोली घनघोर धुमश्चक्रीत पोलिसांनी मंगळवारी सकाळी नक्षलींचा डिव्हिजन कमांडर सुनील कुळमेथे, त्याची पत्नी स्वरूपासह अन्य एका महिला नक्षलीला कंठस्नान घातले. सिरोंचा तालुक्यातील व्यंकटापूर (बामणी) नजीकच्या सिरकोंडा जंगलात सकाळी दहाच्या सुमारास ही चकमक झाली.
सकाळी सशस्त्र दलाच्या सी-६० पथकाचे कमांडो व्यंकटापूर परिसरातील सिरकोंडा जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना १० ते १२ नक्षलींनी त्यांच्यावर गोळीबार केला. धुमश्चक्रीनंतर घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह, तसेच दोन बंदुका, माओवादी पत्रके व अन्य साहित्य सापडले. या वर्षातील हे सर्वांत मोठे यश असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले.
धानोरा तालुक्यातील मुरूमगावच्या बाजारात मंगळवारी आलेल्या तीन नक्षल्यांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता पिस्तुलातून गोळी झाडून दोघे पळून गेले.
२२ लाखांचे बक्षीस
या चकमकीत ठार झालेले सुनील उर्फ विलास मारा कुळमेथे व स्वरूपा उर्फ आमसी पोचा तलांडी या पती-पत्नीचा अनेक नक्षली कारवायांत सहभाग होता. त्यापैकी सुनीलवर १६ लाखांचे, तर स्वरूपावर ६ लाखांचे बक्षीस शासनाने जाहीर केले होते.