वर्षात वर्ग १ चे तीन अधिकारी अडकले
By admin | Published: October 30, 2015 01:45 AM2015-10-30T01:45:36+5:302015-10-30T01:45:36+5:30
२०१५ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात वर्ग १ दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा कोसळला आहे.
एक लाचखोर : दोघांना शिष्यवृत्ती घोटाळा भोवला
गडचिरोली : २०१५ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात वर्ग १ दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा कोसळला आहे. दोन अधिकारी राज्यभर गाजलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात कारागृहाची हवा खावून आता जामिनावर सुटले आहे. तर आॅक्टोबर महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चा कार्यकारी अभियंता आनंद बाळकृष्ण डेकाटे याला ४८ हजार रूपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.
गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वर्ग १ च्या अधिकाऱ्यांवर विविध घोटाळे व लाचेच्या प्रकरणात कारवाई एवढ्या मोठ्या स्वरूपात झालेली आहे. यापूर्वी आलापल्ली, भामरागड व सिरोंचा वन विभागात भरती प्रक्रियेदरम्यान उपवनसंरक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती व त्यांची कारागृहात रवानगी झाली होती. त्यापूर्वी सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी व आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनाही लाचखोरीच्या प्रकरणात बऱ्याच वर्षाआधी पकडण्यात आले होते. वर्ग १ च्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता केल्या जाते याबाबत अनेकदा तक्रारीही होतात. परंतु कारवाई होत नाही, असे दिसून येत असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र शिष्यवृत्ती घोटाळ्यात सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त तुकाराम बरगे व आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता लाचखोरीच्या प्रकरणात कार्यकारी अभियंत्याला अटक झाल्याने पुन्हा एक तिसरा वर्ग १ चा अधिकारी कारवाईच्या जाळ्यात अडकला आहे.
गेल्या वर्षभरात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे तीन अभियंते लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले आहेत, हे विशेष!