सार्वजनिक विहिरीवरील तीन पंप जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:31 PM2019-06-14T22:31:20+5:302019-06-14T22:31:49+5:30
उन्हाळ्याच्या दिवसात विहिरीची पाणी पातळी खालावत असल्याने अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही कर्दुळ येथे चार नागरिकांनी सार्वजनिक विहिरीवर आपले खासगी मोटारपंप लावून पाणी खेचण्याचा सपाटा सुरू केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : उन्हाळ्याच्या दिवसात विहिरीची पाणी पातळी खालावत असल्याने अनेक भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीतही कर्दुळ येथे चार नागरिकांनी सार्वजनिक विहिरीवर आपले खासगी मोटारपंप लावून पाणी खेचण्याचा सपाटा सुरू केला होता. ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित ठिकाणी धाड टाकून विहिरींवरील तीन मोटारपंप शुक्रवारी जप्त केले.
कर्दुळ येथील सार्वजनिक विहिरीवर अवैधरित्या लावलेले मोटारपंप काढून घेण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली होती. चारपैकी एकानेच सार्वजनिक विहिरीवरील मोटारपंप काढून घेतला. सदर विहिरीवर तीन मोटारपंप कायम होते. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक विहिरीवरील तीन मोटारपंप जप्त केले. विनोद चलाख, वसंत चलाख, अनिल बोदलकर यांच्या मालकीच्या एकूण तीन मोटारपंप ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जप्त केले. याप्रसंगी सरपंच विनय बारसागडे, उपसरपंच साईनाथ नेवारे, ग्रा.पं. सदस्य विलास उईके, कवडू भोवरे, कर्मचारी चरणदास सरवर, अनिल पचारे, अमोल कोंडबत्तुलवार, मनोहर रणदिवे हजर होते.
इतरही गावांमध्ये विहिरींवर हातपंप
सार्वजनिक विहिरीवर सर्व नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे या विहिरींवर खासगी पाणी पंप बसविता येत नाही. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत गावातील काही नागरिक विहिरीवर स्वत:चे पाणीपंप बसवितात. त्यामुळे इतर नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.