तीन शिक्षक सांभाळतात सात वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:48 AM2017-12-21T00:48:50+5:302017-12-21T00:49:11+5:30
चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपूर येथील जिल्हा परिषद शाळेत दोन बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी एल्गार पुकारला असून शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्र्कंडादेव : चामोर्शी तालुक्यातील चित्तरंजनपूर येथील जिल्हा परिषद शाळेत दोन बंगाली भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी पालकांनी एल्गार पुकारला असून शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. शिक्षकाची नियुक्ती न केल्यास शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदनातून दिला आहे.
चित्तरंजनपूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. इयत्ता १ ते ५ वी पर्यंत बंगाली माध्यमातून शिकविले जाते. तर इयत्ता सहावी व सातवीला हिंदी माध्यमातून शिक्षण दिले जाते. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची पटसंख्या ६४ आहे. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केवळ एक शिक्षक आहे. सहावी आणि सातवीकरिता दोन मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना अनेक अडचणी येत आहेत. या शाळेत दोन बंगाली भाषिक शिक्षकांची अत्यंत आवश्यकता आहे. शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षक देण्याबाबत वारंवार मागणी केली. मात्र अजूनपर्यंत बंगाली भाषिक शिक्षक देण्यात आले नाही.
२० डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान मूलभूत वाचन विकास प्रशिक्षण असल्याने १ ते ५ या वर्गांना शिकविणारा शिक्षक प्रशिक्षणासाठी जात आहे. या कालावधीत बंगाली माध्यमाचे शिक्षण देणारा एकही शिक्षक नसल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नाही, असे म्हटले आहे.
जोपर्यंत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असेही पालकांनी म्हटले आहे. यामुळे मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. यामुळे तत्काळ शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कमल सुबोध मंडल, लजिका दीनबंधू मंडल, समीर हरेन सरकार, नारायण कृष्ण अधिकारी, दीपक मिस्त्री, उमाशंकर मंडल, भागवता संजय नागपुरे, तपन मंडल, युत्या आशुतोष देवनाथ, मिनती अरूण मंडल, आशा भवतोष बाला, माणिक सुबोध मंडल, रामकृष्ण गाईन, सुनील रामचंद्र बाला, कृष्ण अनिल रप्तान, रबिन खगेन मंडल, रमेश अशोक मंडल, रितेय नयापती, रिदय हालदार, रमेश मंडल, प्रतीक मंडल व ग्रामस्थांनी सीईओंकडे केली आहे.