तीन हजार हेक्टरवर वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:07 AM2018-05-07T00:07:29+5:302018-05-07T00:07:36+5:30
यावर्षीच्या उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ३४४ वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २ हजार ७३७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षीच्या उन्हाळ्यात संपूर्ण जिल्ह्यात १ हजार ३४४ वणव्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यामध्ये सुमारे २ हजार ७३७ हेक्टर जंगल जळून खाक झाले आहे.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात पाऊस कमी झाला. त्याचबरोबर नोव्हेंबरनंतर पावसाने कायमची विश्रांती घेतली. त्यामुळे जंगलातील गवत पूर्णपणे सुकले आहे. थोडीशीही आग लागल्यास त्याचे वणव्यात रूपांतर होत आहे. त्यामुळे यावर्षी जंगलाला आगी लागण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.
मोहफूल वेचण्यासाठी काही नागरिक मोहाच्या झाडाखाली आग लावतात. पुढे ही आग जंगलभर पसरते. तेंदूपत्ता चांगला यावा, यासाठीही आग लावली जाते. तर शेतातील धसकट जाळण्यासाठी लावलेली आग जंगलापर्यंत पोहोचून त्याचे वणव्यात रूपांतर होते. जंगलाने ये-जा करणारे नागरिक बिडी किंवा सिगारेट पिऊन ती रस्त्याच्या कडेला टाकतात. यामुळेही आग लागते. जंगलाला आगी लागण्याची प्रमुख कारणे आहेत.
मागील वर्षी एकूण ९३७ वणवे लागले असल्याची नोंद वन विभागाकडे आहे. या आगींमुळे १ हजार ८१० हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले. तर यावर्षी जंगलांना आगी लागण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येते. एप्रिलपर्यंत जंगलाला आग लागण्याच्या १ हजार ३४४ घटना घडल्या आहेत. यामध्ये २ हजार ३३७ हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले.
जंगलाला आग लागल्यानंतर ती आग कित्येक दूर पसरते. यामध्ये जीव, जंतू, पक्ष्यांचे घरटे, लहान पशु, सुकलेले लाकूड जळून खाक होतात. यामुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जंगलांना आगी लागू नये व लागलेली आग तत्काळ विझावी, यासाठी वन विभागातर्फे शर्तीचे प्रयत्न होत असले तरी आगींच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यात वन विभागाला अजूनपर्यंत पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. वणव्यांमुळे जंगलातील नष्ट होणारी जैवविविधता टिकवून ठेवायची असेल तर वणवे न लागण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यादृष्टीने व्यापक प्रमाणात उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
वन विभागाच्या उपाययोजना
जंगलाला आग लागल्यास जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी होते. याची कल्पना वन विभागाला असल्याने जंगलाला आग लागू नये, यासाठी वन विभागाच्या मार्फत विशेष उपाययोजना केल्या जातात. यामध्ये फायर लाईन जाळण्याचे काम उन्हाळ्याच्या सुरूवातीला केले जाते. प्रत्येक रेंजमध्ये फिरते वाहन उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे फायर ब्लोअर मशीन देण्यात आली आहे. त्याचबरोबर जंगलाला आग लागू नये, याबाबत मार्गदर्शनही केले जात आहे.
सेटलाईटने वेळीच मिळते माहिती
दिवसेंदिवस वन विभाग सुध्दा हायटेक होत चालला आहे. देशभरातील कुठेही जंगलाला लागलेल्या आगीची माहिती सॅटेलाईटद्वारे फॉरेस्ट सर्वे आॅफ इंडियाला मिळते. त्यानंतर ज्या क्षेत्रात आग लागली आहे. त्या क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याला एसएमएसद्वारे वणव्याची माहिती दिली जाते. माहिती मिळताच संबंधित कर्मचारी घटनास्थळी पोहोचून आग विझविते. नासा ही आंतरराष्ट्रीय संस्था सुध्दा आगीच्या घटनांची माहिती व्हॉटस्अॅपद्वारे वन विभागाच्या अधिकाºयांना देते.