गडचिरोलीतील तीन हजार आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार ५०० रूपये विद्यावेतन

By दिलीप दहेलकर | Published: August 20, 2023 04:48 PM2023-08-20T16:48:12+5:302023-08-20T16:48:21+5:30

गडचिरोली जिल्हयात एकुण १६ आयटीआय असून यातील एकुण तीन हजार आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना आता दरमहा ५०० रूपये विद्यावेतन मिळणार आहे.

Three thousand ITI trainees in Gadchiroli will get 500 rupees as tuition fee | गडचिरोलीतील तीन हजार आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार ५०० रूपये विद्यावेतन

गडचिरोलीतील तीन हजार आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार ५०० रूपये विद्यावेतन

googlenewsNext

गडचिरोली : शासकीय आयटीआयमधील प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात ४० रुपयांवरुन ५०० रुपये अशी भरीव वाढ करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय  (शुक्रवारी, दि. १८) ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे तब्बल ४० वर्षानंतर शासनाने हा निर्णय घेतला असून यातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च भागणार आहे. गडचिरोली जिल्हयात एकुण १६ आयटीआय असून यातील एकुण तीन हजार आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना आता दरमहा ५०० रूपये विद्यावेतन मिळणार आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून ४० रुपये इतके विद्यावेतन शैक्षणिक साहित्याकरीता व इतर आवश्यक खर्चाकरीता देण्यात येते. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. वाढत्या महागाई दराच्या व शैक्षणिक साहित्याच्या खर्चामध्ये झालेल्या वाढीनुसार विद्यावेतनात वाढ करण्याची मागणी सातत्याने प्रशिक्षणार्थीकडून करण्यात येत होती.

या निर्णयामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्यांक समाजातील व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया मागास घटकातील प्रशिक्षणार्थ्यांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांच्या मर्यादेत आहे, अशांना लाभ होणार आहे.

१६ आयटीआय, तीन हजार जागा
जिल्ह्यात बाराही तालुक्यांत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत, तर ४ आदिवासी विकास विभागाच्या ४ शासकीय आश्रमशाळांमध्ये औद्योगिक प्रशिक्षणाची सोय केली आहे. अशाप्रकारे एकूण १६ आयटीआय गडचिरोली जिल्ह्यात आहेत. ३ हजार प्रवेश क्षमता जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात एकही खासगी आयटीआय नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊन प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर संबंधित प्रशिक्षणार्थ्याला हमखास स्वयंरोजगार थाटता येतो. तसेच शासकीय व खासगी क्षेत्रातसुद्धा नोकरी व रोजगाराच्या भरपूर संधी आहेत.

यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी
राज्यातील सर्व प्रवर्गातील आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रूपये इतके विद्यावेतन महाडीबीटी पोर्टलमार्फत देण्यात येईल. यापाेटी राज्य शासनावर दरवर्षी ७५.६९ कोटीचा आर्थिक भार पडणार आहे.

हे अभ्यासक्रम उपलब्ध
गडचिराेली जिल्हयातील आयटीआयमध्ये मेकॅनिक डिझेल इंजिन, मेकॅनिक ट्रॅक्टर, वेल्डर, प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर, पत्रे कारागीर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिशियन अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, दोन वर्षीय अभ्यासक्रम वीजतंत्री, तारतंत्री, जोडारी, कातारी यंत्र कारागीर, घर्षक, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल मोटार ड्रॉफ्ट्समन सिव्हिल आदी प्रशिक्षण दिले जातात.

विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल इलेक्ट्रिशियन ट्रेडकडे
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात असले तरी गडचिरोली जिल्ह्यात वीजतंत्री व तारतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल आहे. अन्य ट्रेडला विद्याथ्र्यांकडून प्रतिसाद त्या तुलनेत कमी असला तरी वेल्डर, फिटर, टर्नर व आयटी ट्रेडकडेसुद्धा काही विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो.

Web Title: Three thousand ITI trainees in Gadchiroli will get 500 rupees as tuition fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.