वाळू चाेरी करणारे तीन ट्रॅक्टर पकडले; पण एक ट्रॅक्टर झाला पसार
By गेापाल लाजुरकर | Published: June 11, 2023 05:11 PM2023-06-11T17:11:26+5:302023-06-11T17:11:34+5:30
कुरखेडा येथील सती नदीच्या घाटातून मध्यरात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाळूची तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर तहसीलदारांच्या पथकाने शनिवारी रात्री पकडले.
गडचिराेली : कुरखेडा येथील सती नदीच्या घाटातून मध्यरात्रीच्या सुमारास अवैधरित्या वाळूची तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर तहसीलदारांच्या पथकाने शनिवारी रात्री पकडले. परंतु सर्व ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करीत असताना त्यापैकी एका चालकाने ट्रॅक्टर सुसाट पळवित पसार झाला. ट्रॅक्टर जप्ती हाेण्याच्या धास्तीने चालकाने ट्रॅक्टरसह पाेबारा केला. त्यामुळे केवळ दाेन ट्रॅक्टर पाेलिस ठाण्यात जमा केले.
कुरखेडा तालुक्यात विशेषत: सती नदीत मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैधरित्या उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार राजकुमार धनबाते यांना मिळाली. त्यानुसार धनबाते यांच्या नेतृत्वातील भरारी पथकाने शनिवारी रात्री उशिरा रस्त्यालगत पाळत ठेवली. तेव्हा कुंभीटोला येथील सती नदी पात्रातून वाळू भरून एक ट्रॅक्टर येत असल्याचे दिसले. भरारी पथकाने पाठलाग करून तहसील कार्यालयासमोर एम.एच. ३४ ए. पी. ३११२ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला वाळूसह पकडले.
त्यानंतर सती नदीत वाळू भरत असलेले एम.एच.३३ एफ. ४८११ व एम.एच. ३३ व्ही. ३२३७ क्रमांकाचे दाेन ट्रॅक्टर मोक्यावर पकडले. दाेन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी आणले जात असतानाच एम.एच. ३३ व्ही ३२३७ क्रमांकाचा ट्रॅक्टर वाळूसह चालकाने पळविला. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पकडलेले दोन्ही ट्रॅक्टर कुरखेडा पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवले. वाळूची चाेरी करणारे हे तिन्ही ट्रॅक्टर कुरखेडा, तळेगाव व मालदुगी येथील आहेत. त्यांच्या मालकांविराेधात गौण खनिज कायद्यांतर्गत कारवाईसाठी प्रकरण दाखल दाखल करण्यात आले.
‘ताे’ ट्रॅक्टर तिसऱ्यांदा अडकला
शनिवारी रात्री कारवाईनंतर घटनास्थळावरून पसार झालेला एम. एच. ३३ व्ही ३२३७ क्रमांकाचा ट्रॅक्टर यापूर्वीही दोनदा वाळू उपसाच्या प्रकरणात अडकला हाेता. आता तिसऱ्यांदा पुन्हा वाळू चाेरीत अडकला. सदर ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई अटळ हाेती, ही बाब समजतात तहसील कार्यालयाकडे ट्रॅक्टर नेत असल्याचे चालक व मालकाने भासवून ट्रॅक्टर इतरत्र वळवून वाळू तस्करी करणारे सर्वजण पसार झाले.