तीन गांवाचा विद्युत पुरवठा खंडितच
By admin | Published: July 2, 2016 01:35 AM2016-07-02T01:35:29+5:302016-07-02T01:35:29+5:30
तालुक्यातील चारभट्टी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या पिटेसूर, कोटलडोह व बिरसानगर या तीन गावांतील विद्युत पुरवठा वीज वाहिनीचा तार तुटल्यामुळे ...
महिना उलटला : वीज वाहिनीचा तार तुटला
कुरखेडा : तालुक्यातील चारभट्टी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या पिटेसूर, कोटलडोह व बिरसानगर या तीन गावांतील विद्युत पुरवठा वीज वाहिनीचा तार तुटल्यामुळे मागील महिनाभरापासून खंडित आहे. यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या तीन गावांतील नागरिकांना अंधाराच राहावे लागत आहे.
चारभट्टी परिसरात ६ जून रोजी साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू असताना मंडपाजवळ वीज पडून अनेक वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान यावेळी विद्युत वाहिनीच्या तारेवर वीज पडल्याने तार तुटली. त्यामुळे पिटेसूर, कोटलडोह व बिरसानगर येथील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तेव्हापासून या तीन गावांतील वीज पुरवठा आजही खंडितच आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी कुरखेडा येथील विद्युत विभागाच्या कार्यालयात निवेदन दिले. तसेच तक्रार नोंदवून समस्या मांडली. मात्र विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचे या समस्येकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने वीज दुरूस्तीचे काम करण्यात आले नाही. विद्युत विभागाने तत्काळ वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी, अन्यथा कुरखेडाच्या विद्युत कार्यालयावर मोर्चा काढणार, असा इशारा चारभट्टीचे सरपंच संजय दर्रो, उपसरपंच पीतांबर बह्याळ, ग्रा. पं. सदस्य तुलाराम हारामी, सुरेश कवडो यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)
कमी दाबामुळे शेतकरी त्रस्त
चारभट्टी येथील एक फेज मागील महिनाभरापासून बंद असल्याने गावात कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे. त्यामुळे परिसराच्या शेतातील वीजपंप व बोअरवेल निकामी झालेले आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पावसाअभावी वेळेवर धानाची पेरणी करताना आली नाही. चारभट्टी परिसरात आदिवासी उपयोजनेंतर्गत ३० शेतकऱ्यांना तीन अश्वशक्तीच्या विद्युत पंपाचा पुरवठा करण्यात आला. याशिवाय अनेक खासगी वीजपंपधारक शेतकरी आहेत. मात्र कमी दाबामुळे अडचण आहे.