आश्रमशाळेतील दहावीची विद्यार्थिनी झाली बाळंतीण, मुख्याध्यापकासह तिघे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:54 AM2018-03-30T05:54:23+5:302018-03-30T05:54:23+5:30
आश्रमशाळेतील दहावीतील विद्यार्थिनी चक्क बाळंतीण होऊन तिने एका सुदृढ मुलीला जन्म..
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील वेलगूर आश्रमशाळेतील दहावीतील विद्यार्थिनी चक्क बाळंतीण होऊन तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच दोघा अधीक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, सदर विद्यार्थिनीने दहावीची परीक्षाही दिली आहे. तरी तिच्याबद्दल कोणत्याही शिक्षकाला, अधीक्षकांना संशयही आला
नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
आपल्याच वर्गात शिकणाऱ्या गावाकडच्या विद्यार्थ्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली देऊन कोणाबद्दलही तक्रार नसल्याचे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकाºयांना दिलेल्या जबाबात तिने म्हटले आहे. ती आणि तिचा प्रियकर दोघेही दहावीत असले तरी ते २० वर्षे वयाचे आहेत. यापूर्वी दुसºया गावातील आश्रमशाळेत दोघेही काही वर्ष नापास झालेले आहेत, अशी माहिती सहायक प्रकल्प अधिकारी जी. पी. चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
आश्रमशाळेत प्रसवकळा सुरू झाल्यानंतर सुरूवातीला तिला अहेरी व नंतर गडचिरोलीतील सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. तिने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे तिची ‘नॉर्मल डिलिव्हरी’ झाली आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे नंतर तिला चंद्रपूरला हलविण्यात आले.
यासंदर्भातील तक्रार संस्थेकडून आल्यानंतर अहेरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने तिचा जबाब घेतले. त्यानंतर मुख्याध्यापक एम.एस. कुर्वे, अधीक्षक आर.बी. पोलोजीवार व महिला अधीक्षिका डोंगरे यांना निलंबित केले.
वास्तविक प्रत्येक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वर्षातून किमान तीन वेळा वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते. ही तपासणी फिरते वैद्यकीय पथक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक करते, पण प्रत्यक्षात अशी तपासणी केलीच नसल्याचे स्पष्ट होते.
आश्रमशाळेतील मुलींची नियमित मासिक पाळी येत असल्याची नोंद दर महिन्याला रजिस्टरमध्ये करावी लागते. पीडितेची मासिक पाळी नियमित येत असल्याची रजिस्टरमध्ये आहे.