तीन वर्षांत जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र अडीच पटीने वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 05:00 AM2021-03-06T05:00:00+5:302021-03-05T23:30:32+5:30
रबी हंगामात नाेव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मका पिकाची लागवड केली जाते. १२० दिवसांत हे पीक हाती येते. जवळपास मार्च-एप्रिलमध्ये मका पीक निघते. धान पीक निघाल्यानंतर शेतकरी प्रामुख्याने उडीद, मूग, लाखाेळी, चना या पिकांची लागवड करीत हाेते. मात्र आता याच शेतीत शेतकरी आता मका पिकाची लागवड करीत आहे. शासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन विहिरी उपलब्ध करून दिल्या आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : मागील कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून मका पिकाकडे बघितले जाते. त्यामुळे दरवर्षी मका पिकाखालील क्षेत्र वाढत चालले आहे. मागील तीन वर्षांत सुमारे अडीच पटीने मक्याचे क्षेत्र वाढले आहे. कृषी विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार यावर्षीच्या रबी हंगामात ४ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रांवर मक्याची लागवड झाली आहे.
रबी हंगामात नाेव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मका पिकाची लागवड केली जाते. १२० दिवसांत हे पीक हाती येते. जवळपास मार्च-एप्रिलमध्ये मका पीक निघते. धान पीक निघाल्यानंतर शेतकरी प्रामुख्याने उडीद, मूग, लाखाेळी, चना या पिकांची लागवड करीत हाेते. मात्र आता याच शेतीत शेतकरी आता मका पिकाची लागवड करीत आहे. शासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन विहिरी उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच नैसर्गिक पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना माेटारपंप देण्यात आले आहेत. रबी हंगामात मका पिकाची लागवड केली जात असल्याने या पिकाला पाणी द्यावे लागते. मात्र इतर पिकांच्या तुलनेत या पिकाला कमी पाणी लागते. तसेच इतर पिकांपेक्षा उत्पादन अधिक हाेते. पाळीव जनावरांना खाद्य म्हणूनही उपयाेगी पडते. त्यामुळे शेतकरी आता या पिकाकडे वळत चालला आहे. त्यामुळे दरवर्षी या पिकाचे क्षेत्र वाढत चालले आहे.
२०१८ मध्ये १,५२४ हेक्टरवर मका पिकाची लागवड झाली. त्यानंतर २०१९ मध्ये २,५७१ व २०२०-२१ मध्ये ४,५३४ हेक्टरवर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे.
खरेदी केंद्रांमुळे विक्रीची साेय
दाेन वर्षांपूर्वी मका उत्पादकांना विक्रीची समस्या भेडसावत हाेती. एखाद्या खासगी व्यापाऱ्याला मका विकावा लागत हाेता. यामध्ये शेतकऱ्यांना अतिशय कमी किंमत मिळत हाेती. मागील वर्षीपासून शासकीय खरेदी केंद्रांवर मक्याची खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मक्याला चांगला भाव मिळत आहे. मागील वर्षी १,७६० रुपये क्विंटल दराने मक्याची खरेदी करण्यात आली. खरेदी केंद्रांमुळे मका विक्रीची समस्या दूर झाली आहे. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे.
रानडुकरांमुळे शेतकरी त्रस्त
दिवसेंदिवस मक्याचे क्षेत्र वाढत आहे. मात्र रानडुकरांचा त्रासही वाढत आहे. रानडुकरांकडून पिके उद्ध्वस्त केली जात आहेत. कधीकधी संपूर्ण पीक नष्ट हाेत असल्याने शेतकरी हताश हाेत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे शेत जंगलाला लागून आहेत. वनविभागाने डुकरांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे.
मुलचेरात सर्वाधिक लागवड
जिल्ह्यात मका पिकाचे उगमनस्थान मुलचेरा तालुका आहे. मुलचेरा तालुक्यातील बंगाली समाजाच्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम मका पिकाची लागवड केली. त्यांची अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करण्यास सुरुवात केल्यानंतर जिल्हाभरात मका पिकाचे क्षेत्र वाढले. सद्य:स्थितीत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मका पिकाची लागवड केली जाते. मात्र सर्वाधिक क्षेत्र मुलचेरा तालुक्यातच असल्याचे दिसून येते. या तालुक्यात यावर्षी सुमारे १,०३८ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे.