माजी नगराध्यक्षांच्या पतीसह तिघांना दोन वर्षांचा कारावास
By admin | Published: June 21, 2017 01:29 AM2017-06-21T01:29:15+5:302017-06-21T01:29:15+5:30
नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार पराभूत झाल्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून
जीवे मारण्याचा प्रयत्न : गडचिरोली पोलीस ठाण्यासमोरील हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार पराभूत झाल्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादिस जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या माजी नगराध्यक्ष निर्मला मडके यांचा पती दीपक मडके याच्यासह माजीद हमीद सय्यद व राजेंद्र श्यामराव कुकुडकर या आरोपींना गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी दोन वर्षांच्या सश्रम कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली आहे.
नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान तत्कालीन नगरसेवक अरूण हरडे यांचा दीपक मडके, माजीद हमीद सय्यद व राजेंद्र कुकुडकर यांच्यासोबत २१ डिसेंबर २००९ रोजी वाद निर्माण झाला होता. या वादावरूनच दीपक मडके, माजीद सय्यद व राजेंद्र कुकुडकर यांनी पोलीस स्टेशनसमोरच तलवार, लोखंडी पट्टी, लाकडी काठीच्या सहाय्याने डाव्या हाताचा अंगठा, छातीवर, पाठीवर व मानेवर वार करून गंभीर जखमी केले. याबाबतची तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्यानंतर आरोपींविरोधात भादंवि कलम ३०७, ३४, मु.पो.का. व भा.ह.का.चे कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली. तपास पूर्ण होताच आरोपींच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले.
सरकारी पक्षातर्फे साक्षदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्ष पुरावा तपासून व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी दीपक मडके, माजीद सय्यद व राजेंद्र कुकुडकर या तिघांनाही प्रत्येकी दोन वर्षांचा सश्रम कारावास व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता नीलकंठ भांडेकर यांनी काम पाहिले.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक पी.एम. मडामे यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक जयेश खंदरकर यांनी काम पाहिले. विशेष म्हणजे आरोपीमधील दीपक मडके हा माजी नगराध्यक्ष निर्मला मडके यांचा पती आहे.
अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सात वर्षांचा कारावास
गडचिरोली : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस येथील सत्र न्यायालयाने सात वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. बंडू भदूजी गोडबोले (५०) रा. भेंडाळा, ता.चामोर्शी असे दोषी इसमाचे नाव आहे.
पीडित सहा वर्षीय मुलगी १४ मार्च २०१६ रोजी अंगणात खेळत असताना आरोपी बंडू गोडबोले याने तिला घरी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच तिचा भाऊ व त्याच्या मित्राने घरी जाऊन पाहिले असता आरोपी बंडू गोडबोले हा तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. पीडित मुलीचा भाऊ व त्याच्या मित्रास पाहून आरोपी बंडू गोडबोले याने पळ काढला. पीडित मुलीची आई घरी आल्यानंतर तिने व तिच्या भावाने तिला आपबिती सांगितली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने दुसऱ्या दिवशी चामोर्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी बंडू गोडबोलेवर भादंवि कलम ३५४ (ब) व बालकांवरील लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला त्याच दिवशी अटक केली.
पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कंडारे यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मंगळवारी या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने बंडू गोडबोले यास सात वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. सदर शिक्षा जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश वर्ग २ एस. टी. सूर यांनी सुनावली.