तीन वर्षातच पुलाला पडले खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:54 AM2018-11-22T00:54:58+5:302018-11-22T00:55:52+5:30
अहेरी तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या कोलपल्ली व काटेपल्ली या गावादरम्यान असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुलाच्या कडा यावर्षीच्या पावसाळ्यात वाहून गेल्या. त्याची दुरूस्ती अद्यापही झालेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या कोलपल्ली व काटेपल्ली या गावादरम्यान असलेल्या मोठ्या नाल्यावरील पुलाच्या कडा यावर्षीच्या पावसाळ्यात वाहून गेल्या. त्याची दुरूस्ती अद्यापही झालेली नाही. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन वर्षापूर्वी या पुलाचे बांधकाम झाले असताना एवढ्या लवकर पुलाच्या कडा वाहून कशा गेल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या परिसरात जंगल आहे. तसेच पावसाचे प्रमाण अधिक राहत असल्याने सदर नदी ओसंडून वाहते. पाण्याच्या प्रवाहाचा वेग अधिक राहतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन पूल बांधकाम करतेवेळी संरक्षण भिंत बांधणे आवश्यक होते. मात्र अशाप्रकारची भिंत बांधण्यात आली नाही. परिणामी यावर्षीच्या पावसाळ्यात पुलाच्या दोन्ही कडांची माती वाहून गेली. त्यामुळे या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. मुख्य पूल ते खड्डा यांच्यामध्ये जवळपास तीन फुटाचे अंतर निर्माण झाले आहे. परिणामी या पुलावरून वाहन किंवा दुचाकी नेणे सुद्धा कठीण झाले आहे. खड्ड्यामुळे या परिसरातील नागरिकांना ये-जा करणे सुद्धा अशक्य झाले आहे. मागील आठवड्यात संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. कामाची गती वाढवून सदर काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
पुलापासून काही दूर अंतरावरील डांबरी रस्तासुद्धा उखडून गेला आहे. सदर रस्ता सुद्धा दुरूस्त करणे आवश्यक आहे. संरक्षण भिंतीच्या आतमध्ये केवळ माती न टाकता पक्के बांधकाम करणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात पुन्हा माती वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोलापल्ली व काटेपल्ली येथील नागरिकांनी सातत्याने बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर कामाला मंजुरी देऊन सुरुवात झाली आहे. सदर काम गतीने करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
प्राप्त माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहेरी उपविभागांतर्गत येणाऱ्या या पुलाचे बांधकाम तीन वर्षांपूर्वी बोम्मावार कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आले. परंतू पुलाच्या कामाच्या दर्जाकडे लक्ष न दिल्या गेल्याने काम निकृष्ट दर्जाचे होऊन तीन वर्षातच पुलाच्या कडा वाहून गेल्या. याप्रकरणी संबंधितांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.