गोदावरी नदीपात्रात तीन युवक बुडाले, एका पोलिसाचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 06:37 PM2018-11-21T18:37:11+5:302018-11-21T18:37:30+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील तीन युवक गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रात बुडाले.
सिरोंचा (गडचिरोली) - गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातील प्रसिद्ध कालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील तीन युवक गोदावरी नदीच्या विस्तीर्ण पात्रात बुडाले. तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यात एका पोलीस शिपायाचाही समावेश आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली. सायंकाळपर्यंत त्यांची शोधमोहीम सुरू होती.
अनिल कुडमेथे (२८), महेंद्र पोरटे (२३) आणि रोहीत कडते (२१) अशी मृतांची नावे आहेत. ते तिघेही चंद्रपूर जिल्ह्याच्या पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा येथील रहिवासी होते. यातील अनिल कुडमेथे हे वरोरा पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.
एकूण १० युवक मित्र एमएच ३१, ईए- १३५१ या चारचाकी वाहनाने सकाळी कालेश्वरसाठी निघाले होते. दुपारी कालेश्वरला पोहोचल्यानंतर आधी आंघोळ करण्यासाठी म्हणून ते गोदावरी नदीत उतरले. पण त्यापैकी वरील तिघे खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खात गायब झाले. सायंकाळपर्यंत त्यांचा शोध सुरू होता. ही घटना तेलंगणा राज्याच्या सीमेत घडली.