कोरपर्सीवासीय भागवितात खड्ड्यातील पाण्यावर तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:52 PM2019-06-05T23:52:31+5:302019-06-05T23:52:57+5:30
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कोठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोरपर्सी गावातील हातपंप गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. गावात पाणीपुरवठ्याची दुसरी साधने नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांना नाल्याच्या खड्ड्यांमधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कोठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोरपर्सी गावातील हातपंप गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. गावात पाणीपुरवठ्याची दुसरी साधने नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांना नाल्याच्या खड्ड्यांमधील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. कोरपर्सी गावात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
जंगलव्याप्त असलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावे यंदाच्या उन्हाळ्यात तहानलेली आहेत. हिरव्या जंगलातील गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून पाण्यासाठी वनवन भटकंती करण्याची वेळ आली आहे. याला सर्वस्वी जबाबदार पंचायत समिती प्रशासन असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कोठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कोरपर्सी गावातील हातपंप गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नादुरूस्त स्थितीत आहे. नागरिकांनी इतके दिवस गावालगतच्या नाल्याच्या पाण्यावर आपली तहान भागविली. मात्र एप्रिल महिन्याच्या अखेरीस नाल्यातील पाणी आटल्याने कोरपर्सीवासीयांपुढे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या पर्लकोटा नदीपात्रात जाऊन नागरिक आंघोळ तसेच कपडे धुत होते. पिण्याचे पाणी सुद्धा याच नाल्यातून घरी न्यावे लागत होते. सदर पाणी समस्या मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील हातपंप दुरूस्त करण्याची करण्याची मागणी ग्रामसेवकाकडे केली होती. मात्र ग्रामसेवकाने याकडे सर्रास दुर्लक्ष केले. रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. दरम्यान गावालगतच्या नाल्यात नागरिकांनी लहानसा खड्डा खोदला आता गावातील नागरिक या खड्ड्यातील अशुद्ध पाण्यावर आपली तहान भागवित आहेत. पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी गावातील हातपंपाची दुरूस्ती न केल्यास कोरपर्सीवासीयांना नदीच्या नाल्यातील गढूळ पाणी प्यावे लागणार आहे.
यासंदर्भात कोठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला संपर्क केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद दाखवित होता. ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने त्यांची भेट घेता आली नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.
नारगुंड्यातील दुहेरी नळ योजना नादुरूस्त
भामरागड तालुक्याच्या नारगुंडा येथे प्रशासनाच्या वतीने दुहेरी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ही नळ योजना बंद स्थितीत आहे. यासंदर्भात भामरागड पंचायत समितीमधील पंचायत विस्तार अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, ते काम आमचे नसून ग्रामसेवकाचे आहे. संबंधित ग्रामसेवकाला आपण याबाबत सांगू, असे म्हणून विस्तार अधिकाऱ्यांनी हात झटकले.
पक्क्या रस्त्यांचा अभाव
घनदाट जंगलात वसलेल्या कोरपर्सी गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. येथील नागरिक पायवाटेने गावाला जातात. दरवर्षीच्या पावसाळ्यात पूर येत असल्याने या गावाचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो.