तहानलेले अस्वल शंकरपुरात दाखल
By admin | Published: May 26, 2016 02:27 AM2016-05-26T02:27:23+5:302016-05-26T02:27:23+5:30
२५ मे च्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास शंकरपूर येथे पाण्याच्या शोधात भटकलेली हिंस्त्र अस्वल चक्क दारात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली.
गावकरी झाले भयभीत : नागरिकांच्या दारांवर पाण्यासाठी फिरली
विसोरा : २५ मे च्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास शंकरपूर येथे पाण्याच्या शोधात भटकलेली हिंस्त्र अस्वल चक्क दारात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली.
उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. जंगलातील तसेच गावानजीकचे जलसाठे कोरडे झाल्याने वन्यजीवांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. वडसा-कुरखेडा मार्गावर स्थित शंकरपूर येथील चंद्रमणी लाडे यांच्या घरी बुधवारी पहाटे ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान अस्वलीचे आगमन झाले. हे कळताच ते घाबरून गेले परंतु हिमतीने त्यांनी तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न करताच ती शेजारील घरच्या बाथरुममध्ये घुसली तेव्हापर्यंत आजूबाजूचे नागरिक गोळा होऊन आरडाओरड करताच अस्वलीने नामदेव मेश्राम यांच्या घरी प्रवेश केला.
अखेर पाण्याने व्याकूळ अस्वल मेश्रामच्या घरी पाणी पिऊन घराजवळील रस्ता ओलांडताच शेतातून जंगलाच्या दिशेने पळाली. जंगलात पाण्याचा अंशच उरला नसल्याने तहानलेली अस्वल मानवी वस्तीत आल्याचे दिसून येत आहे.
घरातील अस्वल आगमनाने कसलीही जीवित वा वित्त हानी झाली नसली, तरी भविष्यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारीच्या वनांतील पाणीसाठे आटल्याने या परीसरात प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. वन विभागाने जंगलातील जलसाठे भरण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे हा प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे वन विभागावर रोष आहे. (वार्ताहर)