धान पिकावर तुडतुड्याचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 01:33 AM2018-10-10T01:33:23+5:302018-10-10T01:33:49+5:30
उष्ण व दमट वातावरण धानपिकावरील तुडतुडा किडीसाठी पोषक आहे. सद्य:स्थितीत तुडतुडा किडीचा प्रभाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या आत दिसत असला तरी हवामान बघता या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उष्ण व दमट वातावरण धानपिकावरील तुडतुडा किडीसाठी पोषक आहे. सद्य:स्थितीत तुडतुडा किडीचा प्रभाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्या आत दिसत असला तरी हवामान बघता या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रती चुड पाच ते दहा तुडतुडे आढळून आल्यास उपाययोजना करावी,असे आवाहन गडचिरोलीच्या उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
तुडतुडे किडीच्या व्यवस्थापनासाठी सायपरमेट्रिनसारख्या सिंथेटिक पायरीथ्राईडचा वापर करू नये. त्यामुळे तुडतुड्याचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. टेहळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. चिकट सापळ्यांचा तसेच जैविक कीडनाशकांवर भर देण्यासाठी प्रयत्न करावा. मेटारायझिम अनीसोपली १.१५ टक्के बुक्टी या जैविक बुरशीचा २.५ किलो प्रति हेक्टर वापर करावा. आर्थिक नुकसानीची संकेत पातळी गाठताच इमिडॅक्लोप्रिड १७.८ एसएल २.२ मिली लिटर, ट्रायझेफॉस ४० टक्के प्रवाही १२.५० मिली, इथोफेनफॉक्स १० टक्के प्रवाही १० मिली लिटर, फ्लोनिकॅमिड ५० टक्के ३ ग्रॅम, थायोमिथाक्झाम २५ डब्ल्यूजी २ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी. तसेच तुडतुडे किडीच्या व्यवस्थापनासाठी सेंद्रीय पध्दतीमध्ये पाच लिटर गोमूत्र, पाच लिटर ताक, (एक पाव मिरची, एक पाव लसन, एक पाव कांदे) ठेचा मिश्रण दोन ते तीन दिवस ठेवून १५ लिटर पंपाला १५० मिली लिटर या प्रमाणात फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.