गडचिरोलीत पावसाचे थैमान; पूल वाहून गेले, संपर्क तुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 11:40 AM2019-09-06T11:40:02+5:302019-09-06T11:44:48+5:30
वेधशाळेने विदर्भात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गेल्या काही तासात झालेल्या अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात थैमान घातले आहे. वेधशाळेने विदर्भात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला आहे.
आलापल्ली ते सिरोंचा या मुख्यमार्गावरील मौसम ते नांदगाव च्या मध्ये असलेल्या नाल्याला प्रचंड प्रमाणात पाणी असल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे तसेच कमलापूर ते छललेवाडा मार्गावरील पण एकछोटा पूल वाहून गेल्याची माहिती आहे. गुरुवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने छल्लेवाडा गाव संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेला आहे. येथील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने मध्यरात्रीपासूनच लोकांची तारांबळ उडाली आहे.
वेधशाळेने विदर्भात तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता.त्या अनुषंगाने प्रशासनाने याची दखल घेऊन दिनांक सहा आणि सात सप्टेंबर ला अंगणवाडी,सर्व शाळा आणि महाविद्यालय ला सुट्टी जाहीर केली आहे. वेधशाळेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे अगोदरच नदी,नाले तुडुंब भरून वाहत असताना जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
छल्लेवाडा गावातील नाल्याचा काठावर वसलेले भिमारगुडा, तेलुगूगुडा, कमरपल्ली,आदी मोहल्ल्यातील घरात पाणी शिरल्याने येथील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मध्यरात्री अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्याने लोकांची एकच धावपळ सुरू झाली होती यामध्ये अनेकांचे कोंबडी आणि काही लोकांचे पाळीव प्राणी वाहून गेल्याची माहिती आहे. अचानक पणे पावसाचा कहर सुरू झाला आणि गावाशेजारी असलेल्या नाल्याचे पाणी घरात शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली.सध्या मुसळधार पाऊस सुरूच असून कमलापूर- छल्लेवाडा मार्ग सुद्धा बंद झाला आहे.