थिमेटच्या पाण्याने विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 11:22 PM2018-02-08T23:22:29+5:302018-02-08T23:22:41+5:30

तालुक्यातील धमदीटोला येथील सार्वजनिक विहिरीत थिमेटयुक्त पाणी आढळल्याने गुरुवारी सकाळी गावात खळबळ उडाली आहे. हे थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना विषबाधा झाली.

 Thymet water poisoning | थिमेटच्या पाण्याने विषबाधा

थिमेटच्या पाण्याने विषबाधा

googlenewsNext
ठळक मुद्देसतर्कतेने टळला अनर्थ : धमदीटोलाच्या सार्वजनिक विहिरीतील प्रकार

ऑनलाईन लोकमत
कुरखेडा : तालुक्यातील धमदीटोला येथील सार्वजनिक विहिरीत थिमेटयुक्त पाणी आढळल्याने गुरुवारी सकाळी गावात खळबळ उडाली आहे. हे थिमेटयुक्त पाणी प्यायल्याने काही नागरिकांना विषबाधा झाली. वैद्यकीय अधिकारी व पोलीस गावात पोहचल्यानंतर योग्य उपचार करीत त्यांनी गावकऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
गावातील काही महिला गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्या. या पाण्याने बनवलेला चहा घेताच दोन-तीन जणांना उलट्या होऊ लागल्या. काही महिलांनी स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. परंतु स्वयंपाकातील पदार्थांना दुर्गंधी येऊ लागली. काही क्षणातच ही वार्ता गावभर पसरली. घटनेची माहिती मिळताच भाजपचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य नाजुक पुराम घटनास्थळी गेले. वैद्यकीय अधिकारी डॉ.दामले व सहायक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर हेही आपल्या सहकाऱ्यांसह धमदीटोला येथे पोहचले. त्यांनी चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी सार्वजनिक विहिरीची पाहणी केली असता त्यात थिमेट हा रासायनिक पदार्थ टाकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले.
यावेळी सर्वांनी विहिरीतील पाणी पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले. डॉक्टरांनी विषबाधा झालेल्या नागरिकांची तपासणी करुन औषधोपचार केला. याप्रसंगी पं.स.चे सभापती गिरीधर तितरराम, उपसभापती मनोज दुनेदार, जि.प. सदस्य नाजूक पुराम, सहायक बीडीओ मेश्राम, ग्रामसेवक कोहरे, सरपंच वर्षा धुर्वे, उपसरपंच सुखदेव कोरेटी हेही उपस्थित होते. नागरिकांनी वेळीच सावधगिरी बाळगल्याने व वैद्यकीय अधिकारी वेळेवर पोहचल्याने विषबाधेचा गंभीर परिणाम झाला नाही. संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडण्यात आले.
श्वापदांना पळविण्यासाठी थिमेटचा वापर
थिमेट ही एक स्फोटक रासायनिक पावडर असून तिचा उपयोग शेतातील किंवा घरातील वाळवी नष्ट करण्यासाठी तसेच वन्यपशूंना पळवून लावण्यासाठी केला जातो. या पावडरला कणकीत मिसळून त्याचे गोळे शेतात टाकले जातात. एखाद्या जनावराने ते तोंडात घेऊन चावले असता त्याचा स्फोट होतो व तो वन्यपशू जखमी होतो. गावकरी याचा वापर नेहमी करीत असतात.

Web Title:  Thymet water poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.