सरपण गाेळ्या करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला; आरडाओरड केल्यामुळे वाघाने ठाेकली धूम
By गेापाल लाजुरकर | Published: December 30, 2023 02:07 PM2023-12-30T14:07:15+5:302023-12-30T14:07:45+5:30
गावापासून १ किमी अंतरावर सरण गाेळा करत असताना वाघाने महिलेवर हल्ला केला; परंतु साेबतच्या महिलांनी आरडाओरड केल्यानंतर तेथून वाघाने धूम ठाेकली.
गडचिराेली : गावापासून १ किमी अंतरावर सरण गाेळा करत असताना वाघाने महिलेवर हल्ला केला; परंतु साेबतच्या महिलांनी आरडाओरड केल्यानंतर तेथून वाघाने धूम ठाेकली. मात्र महिला यात किरकाेळ जखमी झाली, ही घटना तालुक्यातील बाेदली येथे शनिवार ३० डिसेंबर राेजी घडली.
मंदाबाई बंडू काेठारे (५० वर्षे) रा. बाेदली असे जखमी महिलेचे नाव आहे. मंदाबाई ह्या इतर ८ ते १० महिलांसाेबत गावापासून १ किमी अंतरावरील जंगलात सरपण गाेळा करण्यासाठी शनिवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गेल्या. हा झुडपी जंगल परिसर प्राथमिक आराेग्य केंद्राला मागच्या बाजूने लागून आहे. सरपण गाेळा करण्यात सर्व महिला व्यस्त असताना परिसरातच वाघ झुडुपात दबा धरून बसला हाेता. सकाळी ११ वाजता संधी साधून वाघाने मंदाबाईवर हल्ला केला; परंतु सुदैवाने त्याचा वार हुकला. मंदाबाईवर वाघाने हल्ला करताच साेबतच्या महिलांनी आरडाओरड केली.
तेव्हा वाघाने तेथून जंगलाच्या दिशेने धूम ठाेकली. हल्ल्यात मंदाबाईच्या कपाळावर व डाेळ्याजवळ पंज्याचे ओरखडे उमटले. याबाबतची माहिती वनविभगाला देण्यात आली. मंदाबाईवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.