हजारो रुपये मिळतील या आशेने काढले ‘त्या’ वाघाचे अवयव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 11:30 AM2022-01-05T11:30:12+5:302022-01-05T11:42:51+5:30
ध्यानीमनी नसताना झालेल्या या शिकारीने त्या शिकाऱ्यांच्या डोक्यात लाईट लागले. वाघाचे अवयव काढून विकल्यास हजारो रुपये मिळतील, असा विचार त्यांच्या मनात आला आणि लागलीच त्याची अंमलबजावणी त्यांनी केली.
प्रशांत ठेपाले
गडचिरोली : जंगलात विशिष्ट ठिकाणी वीज प्रवाहाचा सापळा लावून रानडुक्कर, सांबर, चितळ यासारख्या प्राण्यांची शिकार करणे आणि त्याचे मांस विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय. पण त्या दिवशी त्यांच्या सापळ्यात अनपेक्षितपणे पट्टेदार वाघ अडकला. ध्यानीमनी नसताना झालेल्या या शिकारीने त्या शिकाऱ्यांच्या डोक्यात लाईट लागले. वाघाचे अवयव काढून विकल्यास हजारो रुपये मिळतील, असा विचार त्यांच्या मनात आला आणि लागलीच त्याची अंमलबजावणी त्यांनी केली.
अहेरी वनपरिक्षेत्रात गेल्या ३० डिसेंबरला जमिनीत पुरुन ठेवलेल्या वाघाचा मृतदेह आढळला होता. त्या वाघाची विजेचा करंट देऊन शिकार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाच्या पथकाने २४ तासात तिघांना अटकही केली. याशिवाय एका आरोपीला तेलंगणातून अटक केली. वाघाचे दात, नखे, मिशा आदी अवयव तपास पथकाच्या हाती लागले. वनकोठडीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देताना सर्व घटनाक्रम वनविभागाच्या अधिकाऱ्यांपुढे कथन केला.
अहेरी-आलापल्लीच्या जंगलात मांसभक्षणासाठी किंवा विक्रीसाठी अन्य जंगली प्राण्यांच्या शिकारीचे प्रकार अधूनमधून घडत असले तरी वाघाची शिकार झाल्याचे प्रकरण प्रथमच समोर आले. त्यामुळे वन्यजीव विभागाचे अधिकारी शिकाऱ्यांची टोळी तर या भागात सक्रिय झाली नाही ना, या चिंतेत पडले होते.
अन् शिकाऱ्यांची उडाली घाबरगुंडी
इतर जंगली प्राण्यांसाठी लावलेल्या विद्युत सापळ्यात वाघ अडकल्याचे पाहून शिकाऱ्यांची आधी चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यामुळे वाघाच्या मृत्यूची कुठेही वाच्यता होऊ नये यासाठी त्यांनी तिथेच खड्डा करून वाघाला त्यात गाडण्याचे ठरविले. पण गाडायचेच आहे तर निदान मृत वाघाचे दात, नखे आणि मिशी एवढे अवयव काढले तर हजारो रुपये मिळतील, अशी लालूच त्यांना सुटली. त्यातूनच आधी वाघनखे छाटण्यात आली, परंतु दात काढणे सोपे नव्हते. त्यामुळे वाघाचे मुंडके धडावेगळे करण्यात आले. त्यानंतर धड खड्ड्यात गाडण्यात आले.
पाहुणा म्हणून आला आणि अडकला
ही शिकार झाली तेव्हा गावात कार्यक्रम होता. त्यासाठी तेलंगणातील काही नातेवाईक गावात आले होते. या भागात शिकार करताना पाहुणेही सहभागी होतात. त्यामुळे या शिकारीत तेलंगणातील पाहुणा सहभागी होता. त्यालाही अटक करण्यात आली. दरम्यान, वाघाचे काही दात गायब आहेत. त्यामुळे आणखी काही आरोपी समोर येऊ शकतात. पण त्यांचा वाघाची शिकार करणाऱ्या मोठ्या टोळीशी संबंध असण्याची शक्यता नसल्याचे आतापर्यंतच्या तपासावरून वनविभागाने स्पष्ट केले.