मृत गायीवर कीटकनाशक ओतून केली वाघिणीची शिकार !

By गेापाल लाजुरकर | Published: December 3, 2023 09:19 PM2023-12-03T21:19:33+5:302023-12-03T21:19:44+5:30

कॅमेरे हटवले अन् शिकाऱ्यांनी साधला डाव

Tiger hunted by pouring pesticide on a dead cow! | मृत गायीवर कीटकनाशक ओतून केली वाघिणीची शिकार !

मृत गायीवर कीटकनाशक ओतून केली वाघिणीची शिकार !

गडचिराेली : एटापल्ली तालुक्याच्या वासामुंडी जंगलपरिसरात महिनाभरापूर्वी वाघिणीने एका गायीला ठार केले हाेते. ही बाब वन विभागाच्या लक्षात वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावले हाेते; परंतु दाेन दिवस वाघिणीचे लाेकेशन कॅमेऱ्यात कैद झाले नाही. त्यामुळे तेथील ट्रॅप कॅमेरे काढण्यात आले. हीच संधी साधत शिकाऱ्यांनी मृत गायीवर कीटकनाशक ओतून वाघिणीची शिकार केली.

वासामुंडी जंगल परिसरात वाघिणीने गायीची शिकार केल्यानंतर वन विभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावले. वाघीण ही गायीचे मांस खाण्यास परत येणार, असा वन कर्मचाऱ्यांचा अंदाज हाेता; मात्र दोन दिवस उलटूनही वाघीण गायीचे मांस खाण्यासाठी आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ट्रॅप कॅमेरे काढले. दरम्यान वन कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर आरोपी नजर ठेवून हाेते. कॅमेरे काढताच वासामुंडीतील आरोपींनी एटापल्लीच्या कृषी केंद्रातून कीटकनाशक खरेदी करून मृत गायीच्या मांसावर ओतले. यानंतर एक दिवस वाघिणीने त्या गायीचे मांस खाल्ले व तिचा मृत्यू झाला. वाघिणीची शिकार केल्यानंतर आराेपींकडून कातडे विक्री करण्याचासाठी प्रयत्न सुरू हाेते; परंतु त्यांना यश आले नाही. मांसाची वाहतूक करतानाच ते वनविभागाच्या जाळ्यात अडकले.

छत्तीसगडला माहीत झाले, आलापल्ली अनभिज्ञ?
शिकार झालेल्या वाघिणीचे कातडे विक्री केले जाणार आहे, याबाबत छत्तीसगडच्या वन विभागाला माहिती झाली. तेथील पथक एटापल्लीला आले व एटापल्ली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना साेबत घेऊन शिकाऱ्यांना कातड्यासह अटक केली. वाघिणीच्या शिकारीची घटना आलापल्ली वन विभागांतर्गत येते. हे घटनास्थळ एटापल्लीपासून ७ कि.मी.अंतरावर आहे. छत्तीसगडच्या वनाधिकाऱ्यांना वाघिणीची शिकार व कातड्याच्या तस्करीची माहिती हाेते; पण आलापल्ली वन विभागाला का माहीत हाेत नाही, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

आराेपींची संख्या वाढणार?
वन विभागाने वाघीण शिकार प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. तरीसुद्धा या प्रकरणातील आराेपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. एटापल्लीतील एका कापड दुकानदारासह येथीलच पुन्हा दाेघांचा शिकारीशी संबंध असल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: Tiger hunted by pouring pesticide on a dead cow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.