‘त्या’ वाघाचा मृत्यू वर्चस्वाच्या लढाईतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 11:34 AM2022-01-07T11:34:09+5:302022-01-07T11:47:55+5:30
काटली लावालगतच्या तलावाजवळ बुधवारी अचानक मरण पावलेल्या वाघाचा मृत्यू दोन नर वाघांच्या झुंजीत जखमी होऊन झाल्याचा दाट अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. हा वाघ अंदाजे ३ ते ४ वर्षांचा होता.
गडचिरोली : शहरापासून अवघ्या १० किलोमीटरवर असलेल्या काटली लावालगतच्या तलावाजवळ बुधवारी एक नर वाघाचामृत्यू(Tiger Death) झाल्याची घटना समोर आली होती. या वाघाचामृत्यू दोन नर वाघांच्या झुंजीत(Fight) जखमी होऊन झाल्याचा दाट अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. शवविच्छेदनात या वाघाच्या मानेवर, पायाला दुसऱ्या वाघाच्या चाव्याच्या जखमा आढळल्या.
नागपूर मार्गावरील काटली गावाजवळच्या तलावाजवळ दुपारी हा वाघ आला होता. काही गावकऱ्यांच्या तो नजरेस पडल्यानंतर त्याला पाहण्यासाठी गावकरी जमले होते. पण बराच वेळ तो तलावाबाहेर आला नाही. बाहेर आल्यानंतर तो एका जागी बसला तर पुन्हा उठलाच नाही. सायंकाळी वनविभागाने जवळ जाऊन तपासणी केली असता तो मृतावस्थेत होता.
गुरुवारी (दि.६) सकाळी मृत वाघाला पोर्ला वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात आणून शवविच्छेदन केले. यावेळी देसाईगंजचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहायक वनसंरक्षक मनोज चव्हाण, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, गडचिरोलीचे डॉ. बी.आर. रामटेके आदी उपस्थित होते. हा वाघ अंदाजे ३ ते ४ वर्षांचा होता.