पंजाब-हरयाणातील बावरिया टाेळीच्या जाळ्यात आणखी काेण-काेण?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 11:56 AM2023-07-31T11:56:04+5:302023-07-31T11:56:46+5:30
वाघ शिकार प्रकरण : वन विभागाकडून चाैफेर तपास
गडचिराेली : पंजाब व हरयाणा राज्यातील बावरिया जमातीच्या टाेळीने गडचिराेली वन विभागातील दाेन वाघांची शिकार केल्याची कबुली चाैकशीदरम्यान दिली. परंतु, वाघासारख्या हिंस्त्र प्राण्यांची शिकार परराज्यातून आलेल्या टाेळीने स्थानिकांच्या सहभागाशिवाय किंवा सहकार्याशिवाय करणे सहज शक्य नाही. सदर शिकार प्रकरणात स्थानिकांचा सहभाग आहे काय, यादृष्टीने वन विभागाकडून चाैकशी व तपास सुरू आहे.
चातगाव व वडसा वन विभागातील पाेर्ला वन परिक्षेत्राचा बहुतांश भाग गडचिराेली तालुक्यात समाविष्ट आहे. हा जंगल परिसर दिभना, जेप्रा, आंबेशिवणी ते अमिर्झा तसेच कळमटाेला, धुंडेशिवणी, चुरचुरा, गाेगाव आदी गावांच्या मधाेमध आहे. याच परिसरात सहा वाघांचा वावर हाेता. या वाघांपैकी दाेन वाघांची शिकार केली, अशी कबुली आराेपी करमचंद बावरी याने दिली. दाेनपेक्षा अधिक वाघांची शिकार झाली असावी, असाही संशय बळावत आहे. त्यामुळे या शिकारी टाेळीने नेमकी किती वाघांची शिकार केली, हे सखाेल चाैकशीनंतरच पुढे येईल.
...हे प्रश्न अनुत्तरीत
शेतशिवार तसेच रस्ते व मानवी वावर असलेल्या परिसरात वाघांच्या देखरेखीसाठी वन विभागाने टायगर माॅनिटरिंग ग्रुपचे गठन केले हाेते. एका बीटमध्ये १२ ते १४ सदस्य याप्रमाणे वाघांचा वावर असलेल्या गाव परिसरतील बेराेजगार युवाना नेमले हाेते. त्यांना दीड वर्षे राेजगार देऊन ३१ मार्च २०२३ राेजी कामावरून कमी करण्यात आले. तसेच दुसऱ्याच दिवशी वन विभागाने दिभना, आंबेटाेला, राजगाटा, कळमटाेला तसेच अन्य भागात लावलेले एकूण ८० कॅमेरे काढले. टायगर माॅनिटरिंग ग्रुपच्या सदस्यांना कामावरून का बंद केले व जंगलातील फाेटाे कॅप्चर कॅमेरे का काढले, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
पाेर्ला क्षेत्रातील वाघ दिशेनासे
वडसा वनविभाग व गडचिराेली तालुक्यात समाविष्ट पाेर्ला वन परिक्षेत्रातसुद्धा जवळपास सहा वाघांचा वावर हाेता. पाेर्ला - वडधा मार्गाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना अधूनमधून वाघांचे दर्शन हाेत हाेते. परंतु, त्या वाघांपैकी आता एकही वाघ दिसून येत नाही. या वाघांचीसुद्धा शिकार तर झाली नसावी ना, असा प्रश्न आहे.
वनरक्षक, वनपाल व आरएफओंना निलंबित करा : याेगाजी कुडवे
आंबेशिवणी, आंबेटाेला व मुरुमबाेडी परिसरात वाघांचा वावर हाेता, ही बाब स्थानिक वन कर्मचारी व त्यांच्या अधिकाऱ्यांनाही माहीत हाेती. तरीसुद्धा बावरिया जमातीच्या लाेकांना वन विभाग (शंकरपट) च्या जागेवर झाेपड्या उभारण्याची एकप्रकारची संधी वन कर्मचाऱ्यांनी दिली. त्यांची काेणतीही चाैकशी केली नाही. याप्रकरणी वनरक्षक, वनपाल व आरएफओसुद्धा तेवढेच जबाबदार आहे. केवळ दाेनच नव्हे तर अधिक वाघांची शिकार झाली असावी. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते याेगाजी कुडवे यांनी केली.
आंबेशिवणी जंगल परिसरातील दाेन वाघांच्या शिकारप्रकरणी ११ आराेपींना २ ऑगस्टपर्यंत वन काेठडी, तर दाेन महिला आराेपींना ९ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन काेठडी सुनावली आहे. बावरिया टाेळीतील आराेपींसह स्थानिकांचा यात सहभाग आहे काय, या दृष्टीनेसुद्धा तपास सुरू आहे.
- मिलिश शर्मा, उपवन संरक्षक वनविभाग, गडचिराेली