वाघाची वन विभागाला हुलकावणी
By admin | Published: May 26, 2017 02:17 AM2017-05-26T02:17:28+5:302017-05-26T02:17:28+5:30
नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून रवी गावातील जंगल परिसरात आठ दिवसांपासून दोन पिंजरे लावले आहेत.
पिंजरे ठरले कुचकामी : गुंगीच्या इंजेक्शनसाठी परवानगीची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडून रवी गावातील जंगल परिसरात आठ दिवसांपासून दोन पिंजरे लावले आहेत. मात्र वाघ पिंजऱ्यात न अडकता हुलकावणी देत आहे. वाघाला पकडण्यासाठी त्याला गुंगीचे इंजेक्शन देणे हा दुसरा पर्याय आहे. मात्र नागपूरस्थित प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने (वन्यजीव) अजूनपर्यंत परवानगी दिली नाही. त्यामुळे वाघ मोकाटच फिरत आहे.
मागील १५ दिवसांपासून आरमोरी तालुक्यातील रवी, अरसोडा, कासवी, कोंढाळा या भागात वाघाने धुमाकूळ घातला आहे. अगदी रस्त्याच्या कडेला वाघ बसून राहत असल्याने देसाईगंज-आरमोरी मार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना तसेच सामान्य नागरिकांनाही वाघाचे दर्शन होत आहे. मात्र रवी, अरसोडा, कासवी गावातील नागरिक जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत. वाघाच्या दहशतीमुळे घराच्या बाहेर पडणे बंद झाले आहे. खरीप पूर्व हंगामाची कामे ठप्प पडली आहेत. रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वाघ पिंजऱ्यात अडकत नसल्याने सदर वाघाला शॉर्पशुटरच्या मदतीने इंजेक्शन देऊन बेशुध्द करण्याची परवानगी नागपूर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे मागितली आहे. मात्र अजूनपर्यंत याला परवानगी मिळाली नाही. वनमंत्र्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.