वाघाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:17 PM2018-01-28T22:17:58+5:302018-01-28T22:18:09+5:30
तालुक्यातील टेंभा जंगल परिसरात मागील पंधरवड्यापासून वाघाचा धुमाकूळ आठवडाभरात वाघाने गाय व म्हशीला ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तालुक्यातील टेंभा जंगल परिसरात मागील पंधरवड्यापासून वाघाचा धुमाकूळ आठवडाभरात वाघाने गाय व म्हशीला ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
टेंभा परिसरात वडधा, डार्ली, नरोटी, बंजाळी, मरेगाव, चांभार्डा, मौशीखांब आदी गावांचा समावेश आहे. सदर गावांच्या परिसरात १० ते १२ किमी अंतरात जंगल पसरले आहे. आठवड्यात गणपूर देवस्थानाजवळ वाघाने एका म्हशीला ठार केले. तसेच चांभार्डाच्या जंगलात एका गायीला वाघाने ठार केले. तसेच काही वन्यप्राण्यांनाही भक्ष केले आहे. या भागात वाघाचा वावर वाढला असून रात्रीच्या सुमारास वाघ टेंभा, चांभार्डा परिसरातून फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाघाच्या भीतीमुळे टेंभा व खरपी येथील अनेक पशुपालकांनी आपल्याला जनावरांना बिल्ले लावून विमाही उतरविला आहे. अनेक पशुपालक कच्चा गोठ्यांमध्ये आपल्या जनावरांना रात्रीच्या सुमारास बांधायचे. परंतु आता वाघाच्या भीतीमुळे जनावरांना बाहेर बांधणे बंद केले आहे. नागरिकही धास्तावले आहेत. वन विभागाने या वाघाचा योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.