वाघाने घेतला दोन बैलांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2017 01:49 AM2017-06-14T01:49:15+5:302017-06-14T01:49:15+5:30
आरमोरी तालुक्यातील वडधा येथून चार किमी अंतरावर येत असलेल्या चुरचुरा जंगल परिसरात वाघाने हल्ला केल्याने
देलोडा येथील शेतकऱ्याचे नुकसान : वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वडधा : आरमोरी तालुक्यातील वडधा येथून चार किमी अंतरावर येत असलेल्या चुरचुरा जंगल परिसरात वाघाने हल्ला केल्याने दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली.
देलोडा येथील भास्कर बावणे यांनी चरण्यासाठी बैल जंगलात सोडले होते. सायंकाळी उशीरापर्यंत बैल परत न आल्याने जंगलात शोधाशोध केली असता, वाघाने दोन्ही बैलांना ठार केल्याचे दिसून आले. यामुळे बावणे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. सदर माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वनरक्षक नरोटे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ऐन पावसाळ्यात दोन्ही बैल ठार झाल्याने शेती कशी करावी, असा प्रश्न बावणे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. वन विभागाने बावणे यांना तत्काळ आर्थिक मदत करावी, त्याचबरोबर वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देलोडातील नागरिकांनी दिला आहे.