महिलेचा बळी घेणारी वाघीण जेरबंद, ताडोबा रेस्क्यू टीमची कारवाई
By संजय तिपाले | Published: September 17, 2023 02:08 PM2023-09-17T14:08:53+5:302023-09-17T14:10:31+5:30
फरी जंगलात होती दहशत
संजय तिपाले/गडचिरोली: गवत कापण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर हल्ला करून बळी घेणाऱ्या टी- १४ वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला १७ सप्टेंबरला सायंकाळी यश आले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बचाव पथकाने देसाईगंज वनक्षेत्रात ही कारवाई केली.
देसाईगंज वनक्षेत्रातील फरी येथे जंगलाला चिकटून शेती आहे. ११ सप्टेंबर रोजी महानंदा मोहूर्ले (५१, रा. फरी) या गवत कापण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कक्ष क्र. ८५३ मध्ये टी- १४ या वाघिणीने हल्ला केला. त्यानंतर ५० मीटर अंतरावर जंगलात फरफटत नेऊन ठार केले होते. यानंतर त्याच रात्री या वाघिणीने शेळीचा फडशा पाडला होता. या वाघिणीचे वास्तव्य कायम असल्याने उसेगाव, फरी, शिवराजपूर, अरततोंडी या मार्गावर आवागमन करणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सापळा लावून ट्रॅप कॅमेरेही लावले होते. वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र- शिवराजपुर मधील कक्ष क्र. ८६६ मध्ये चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शुटर अजय मराठे यांनी डार्ट करून (इंजेक्शन देऊन) वाघिणीला बेशुद्ध केले. त्यानंतर चमुच्या सहाय्याने तिला कोणतीही इजा न करता पिंजऱ्यात कैद केले. वनसंरक्षक एस. रमेशकुमार, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, उपविभागीय अधिकारी मनोज चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, क्षेत्रीय कर्मचारी अक्षय दांडेकर यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
तपासणी करून पाठवले नागपूर व्याघ्रप्रकल्पात जेरबंद करण्यात आलेल्या टी- १४ वाघिणीचे वय अंदाजे २ वर्षे आहे. सदर वाघिण।णीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय गोरेवाडा, नागपुर येथे हलविण्यात आले आहे.