गडचिरोलीत पाच तासांच्या सर्च ऑपरेशननंतर वाघीण जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2023 07:40 PM2023-03-20T19:40:49+5:302023-03-20T19:41:21+5:30
Gadchiroli News गडचिरोली शहरातील कृषी कार्यालयाच्या परिसरात २० मार्चला दुपारी सव्वा बारा वाजता एक वाघीण आढळून आली, त्यामुळे एकच खळबळ उडाली. वनविभागाने चंद्रपूर येथील शार्प शूटरच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवून पाच तासानंतर वाघिणीला जेरबंद केले.
गडचिरोली: शहरातील कृषी कार्यालयाच्या परिसरात २० मार्चला दुपारी सव्वा बारा वाजता एक वाघीण आढळून आली, त्यामुळे एकच खळबळ उडाली. वनविभागाने चंद्रपूर येथील शार्प शूटरच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवून पाच तासानंतर वाघिणीला जेरबंद केले.
शहरातील चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौकाजवळील कृषी महाविद्यालयासमोर कृषी विज्ञान केंद्र असून तेथे रोपवाटिका आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दुपारी सव्वा बारा वाजता कृषी महाविद्यालयाकडून धावत आलेली वाघीण चंद्रपूर रोड ओलांडून कृषी विज्ञान केंद्र कार्यालयाच्या आवारात शिरली. या वाघिणीला कार्यालयाच्या आवारात जाताना काही नागरिकांनी पाहिले. त्यानंतर रोपवाटिकेत ती नजरेआड झाली. उपवनसंरक्षक मीलेशदत्त शर्मा, सहायक वनसंरक्षक सोनल भडके, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, गडचिरोली ठाण्याचे पो.नि. अरविंदकुमार कतलाम यांनी धाव घेतली. वनविभागाचे शंभरवर कर्मचारी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी होते.
कार्यालयाला छावणीचे स्वरूप
दरम्यान, चंद्रपूर रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक वाघिणीला पाहण्यासाठी थांबत होते, सुरक्षेची खबरदारी म्हणून कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले होते. कार्यालयाच्या संपूर्ण परिसराला पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. वनविभागाचे अधिकारी व पोलिसांमुळे या कार्यालयाला छावणीचे स्वरुप आले होते. त्यामुळे कार्यालयीन कामकाजही विस्कळीत झाले होते.
..अन् चंद्रपूरच्या रेस्क्यू टीमला यश...
वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा मागवला. शिवाय चंद्रपूरहून रेस्क्यू टीम पाचारण केली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ.रविकांत खोब्रागडे, शीघ्र कृती दलाचे शुटर पोलिस नाईक अजय मराठे, वाहनचालक अमोल कोरपे यांच्या पथकाने सायंकाळी पाच वाजता वाघिणीला यंत्राद्वारे गुंगीचे इंजेक्शन देऊन बेशुध्द केले. त्यानंतर पिंजऱ्यात घालून मुख्य वनसंरक्षक कार्यालयात नेले. दुपारी बारा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत भरउन्हात हे रेस्क्यू ऑपरेशन चालले.
....